विशाखापट्टणम : आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये दिल्लीने हैदराबादवर शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. पण या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये वेगळंच नाट्य पाहायला मिळालं. अनेक उतार चढाव आलेल्या या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला अमित मिश्रा फिल्डिंगमध्ये बाधा आणल्याप्रकरणी (ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड) आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये दिल्लीने टॉस जिंकून हैदराबादला पहिले बॅटिंगला बोलावलं. २० ओव्हरमध्ये हैदराबादला १६२/८ एवढाच स्कोअर करता आला. हैदराबादकडून मार्टीन गप्टीलने सर्वाधिक ३६ रन केले. १६३ रनचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉने ३८ बॉलमध्ये ५६ रनची आणि ऋषभ पंतने २१ बॉलमध्ये ४९ रनची आक्रमक खेळी केली. ऋषभ पंत आऊट झाला तेव्हा दिल्लीला ७ बॉलमध्ये ५ रनची गरज होती.


दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक रन काढणं कठीण होत चाललं होतं. तेव्हा अमित मिश्रा वेगळ्याच पद्धतीने आऊट झाला. मॅचची शेवटची ओव्हर खलील अहमद टाकत होता. खलीलने पहिलाच बॉल वाईड टाकला. यानंतर पहिल्या बॉलवर अमित मिश्राने एक रन काढली. दुसऱ्या बॉलवर एकही रन निघाली नाही. यानंतर तिसऱ्या बॉलवर कीमो पॉलने एक रन काढली.


आता शेवटच्या ३ बॉलमध्ये दिल्लीला २ रनची गरज होती. अमित मिश्राने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण हा बॉल मिश्राच्या बॅटला न लागता विकेट कीपर ऋद्धीमान सहाच्या हातात गेला. यानंतरही मिश्रा एक रन काढण्यासाठी गेला. सहाने खलील अहमदच्या दिशेने बॉल फेकला. खलील अहमद स्टम्पच्या दिशेने बॉल फेकत असताना अमित मिश्राने त्याच्या धावण्याची दिशा बदलली आणि तो बॉलच्या मध्ये आला. दिशा बदलल्यामुळे बॉल स्टम्पला न लागता अमित मिश्राला लागला.


या प्रकारानंतर हैदराबादच्या टीमने अपील केलं. अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर डीआरएस घेण्यात आला. डीआरएस हा अमित मिश्राच्या कॅच आऊटसाठी घेण्यात आला होता. पण बॅटला बॉल न लागल्यामुळे मिश्राला नॉट आऊट देण्यात आलं. असं असलं तरी फिल्डिंगमध्ये बाधा आणल्याप्रकरणी मात्र थर्ड अंपायरने मिश्राला आऊट दिलं.



आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा एखादा खेळाडू अशाप्रकारे आऊट झाला आहे. याआधी २०१३ साली पुण्याविरुद्ध युसुफ पठाणही असाच आऊट झाला होता. अमित मिश्राच्या अशा आऊट होण्यामुळे दिल्लीचं फारसं नुकसान झालं नाही. कीमो पॉलने पुढच्याच बॉलला फोर मारून दिल्लीला जिंकवून दिलं. आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्लीचा सामना चेन्नईशी होणार आहे. या मॅचमध्ये विजयी झालेली टीम फायनलमध्ये मुंबईविरुद्ध खेळेल. दिल्ली आणि चेन्नईमधला सामना १० मे रोजी खेळवला जाईल, तर फायनल १२ मे रोजी होणार आहे.