मुंबई :  आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबई आणि चेन्नई या टीममध्ये आयपीएलची फायनल रंगेल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना होईल. संध्याकाळी ७.३० वाजता मॅचला सुरुवात होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहासात आतापर्यंत प्रत्येकी तीन-तीनवेळा विजेतेपद पटकावणारे मुंबई आणि चेन्नई संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी आमने-सामने उभे ठाकणार आहेत. या हंगामात यापूर्वी हे दोन्ही संघ तीनवेळा एकमेकांशी भिडले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईनं विजय साकारलाय. २०१०, २०१३ आणि २०१५ साली मुंबई आणि चेन्नई यांच्यात फायनल झाली होती. यातल्या २०१० सालच्या फायनलमध्ये मुंबईचा पराभव झाला होता, तर २०१३ आणि २०१५ साली मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला होता.


तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २९ सामने झाले असून मुंबईनं १७ तर चेन्नईनं १२ लढती जिंकल्या आहेत. याखेरीज याच दोन्ही संघांमध्ये यापूर्वी तीनवेळा अंतिम सामना रंगलाय. यामध्ये दोनवेळा मुंपबईनं विजेतेपद मिळवलं असून एकदा चेन्नई विजयी ठरलीय. मुंबईनं पाचव्यांदा तर चेन्नईनं आठव्यांदा अंतिम फेरी गाठलीय.


मुंबईनं या हंगामात सर्वाधिक प्रभावशाली कामगिरी केलीय. मुंबईनं ९ सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं होतं. तर २०-२०मध्येही अनुभव किती महत्त्वाचा असतो हे चेन्नईनं आपल्या काही विजयांनी दाखवून दिलंय. रोहित आणि डिकॉकवर मुंबईच्या सलामीची जबाबदारी असेल.


सुर्यकुमार यादवला नंबर तीनला न्याय द्यावा लागेल. कृणाल पंड्यानं तळाला चांगली फलंदाजी केलीय. तर हार्दिकला जर सूर गवसला तर तो स्फोटक फलंजादी करु शकतो. जसप्रीत बुमराह आणि मलिंगावर मुंबईच्या गोलंदाजीची मदार असेल. तर चेन्नईकडे खुद्द धोनी हाच हुकमी एक्का असेल.


डुप्लेसिस-वॉटसनवर चेन्नईच्या सलामीची जबाबदारी असेल. या मोसमात वॉटसन आणि रैनाला काही छाप सोडता आलेली नाही. मात्र अंबाती रायुडू धडाका दाखवू शकतो. जाडेजा, ब्राव्हो, भज्जी आणि इम्रान ताहिर यांच्यावर चेन्नईच्या गोलंदाजीची मदार असेल.


रोहित-धोनीला इतिहास घडवण्याची संधी


आत्तापर्यंत सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचा रेकॉर्ड मुंबई आणि चेन्नईच्या नावावर आहे. या दोन्ही टीमनी प्रत्येकी तीन-तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएलमध्ये विजय मिळवला. तर चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ साली आयपीएल जिंकली आहे. यानंतर कोलकाता, हैदराबादने २ वेळा आणि राजस्थानने एकवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.


आजच्या फायनलमध्ये विजय झाला तर सर्वाधिक ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा इतिहास रोहित किंवा धोनीच्या नावावर होईल.


आयपीएल जिंकणाऱ्या टीम


२००८- राजस्थान 


२००९- हैदराबाद


२०१०- चेन्नई


२०११- चेन्नई


२०१२- कोलकाता 


२०१३- मुंबई


२०१४- कोलकाता


२०१५- मुंबई 


२०१६- हैदराबाद 


२०१७- मुंबई 


२०१८- चेन्नई