मुंबई : २३ मार्चपासून आयपीएलच्या १२व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. याआधीच्या वर्षांप्रमाणेच यंदाच्या मोसमातही मॅच रात्री ८ वाजता सुरु होतील, असं बीसीसीआयवर सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितलं. दुपारच्या मॅचही नेहमीप्रमाणे ४ वाजता सुरू होतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या मॅच संध्याकाळी ७ वाजता सुरु करण्याबाबत बीसीसीआयवर दबाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण बहुतेक टीम रात्री ८ वाजताच मॅच सुरु करण्यासाठी आग्रही होत्या. यामुळे मॅच रात्री ८ लाच सुरु होतील, असा निर्णय प्रशासकीय समितीच्या बैठकीत झाला.


मागच्यावर्षीही मॅच ७ वाजता सुरु होतील अशा अफवा पसरल्या होत्या. पण प्ले ऑफ आणि फायनल वगळता सगळे सामने ८ वाजताच सुरु झाले. मागच्यावर्षी प्ले ऑफ आणि फायनलचे सामने ७ वाजता सुरु झाले होते.


'बीसीसीआयनं ८ वाजता मॅच खेळवण्याचा निर्णय कायम ठेवल्याचं आम्ही स्वागत करतो', अशी प्रतिक्रिया टीमच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली.


आयपीएलचं वेळापत्रक



मागच्या महिन्यामध्ये बीसीसीआयनं आयपीएलच्या पहिल्या २ आठवड्यांसाठीच्या वेळापत्रकाची घोषणा केली. निवडणुकींच्या तारखा जाहीर न झाल्यामुळे यावर्षी फक्त २ आठवड्यांचं वेळापत्रक घोषित करण्यात आलं. निवडणुकीच्या तारखा कळल्यानंतर आयपीएलचं उरलेलं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.


२३ मार्चला गतविजेत्या चेन्नईचा मुकाबला बंगळुरूविरुद्ध होणार आहे. चेन्नईच्या स्टेडियमवर हा सामना रंगेल.