VIDEO: कॅच घेतल्यावर कोहलीने चिडवलं, अश्विनचा ताबा सुटला
आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रनने विजय झाला.
बंगळुरू : आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १७ रनने विजय झाला. पण या मॅचमध्ये शेवटी ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला विजयासाठी २७ रनची गरज होती. पंजाबचा कर्णधार अश्विनने उमेश यादवच्या पहिल्या बॉलला सिक्स मारला. यानंतर पुढच्या बॉललाही सिक्स मारण्याच्या प्रयत्नात लॉन्ग ऑनवर विराट कोहलीने अश्विनचा कॅच घेतला.
अश्विनचा कॅच पकडल्यानंतर विराट कोहलीने त्याला चिडवलं आणि इशारा केला. आऊट झाल्यानंतर अश्विनचाही ताबा सुटला. डग आऊटमध्ये जाताना अश्विनने त्याचे ग्लोव्हज फेकून दिले. कोहली आणि अश्विनचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
बंगळुरूने ठेवलेल्या २०२ रनचा पाठलाग करताना पंजाबने कडवं आव्हान दिलं. पॉवर प्ले मध्येच पंजाबने १ विकेट गमावून ६८ रन केले होते. तर १० ओव्हरपर्यंत पंजाबचा स्कोअर १०५ रन झाला होता. केएल राहुल आऊट झाल्यानंतर निकोलास पूरनने १६व्या ओव्हरमध्ये टीमचा स्कोअर १५० पर्यंत पोहोचवला. १८ ओव्हरपर्यंत पंजाबला विजयासाठी १२ बॉलमध्ये ३० रनची गरज होती. इकडूनच पंजाबच्या अडचणी वाढायला लागल्या.
१९व्या ओव्हरमध्ये नवदीप सैनीने पहिले डेव्हिड मिलरला आणि शेवटच्या बॉलवर निकोलास पूरनला आऊट केलं. या ओव्हरमध्ये सैनीने फक्त ३ रनच दिले. आता पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी २७ रन हवे होते. अश्विनने पहिल्या बॉलला सिक्स मारून पंजाबच्या आशा पल्लवीत केल्या, पण पुढच्याच बॉलला तो आऊट झाला. अश्विन आऊट झाल्यानंतर विलियनही आऊट झाला. मग मात्र पंजाबच्या हातातून ही मॅच निसटली.