IPL 2019: मुंबईकडून सर्वाधिक रन, तरी सेहवाग या खेळाडूवर नाराज
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी ठिकठाक राहिली आहे.
मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी ठिकठाक राहिली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या ७ मॅचपैकी ४ मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला, तर ३ मॅचमध्ये रोहितच्या टीमला पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम ८ पॉईंटसह चौथ्या क्रमांकावर आहे.
क्विंटन डीकॉक हा यंदाच्या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. डिकॉकने ७ मॅचच्या ७ इनिंगमध्ये ३४ ची सरासरी आणि १३६ च्या स्ट्राईक रेटने २३८ रन केले आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईकडून सर्वाधिक रन केले असले, तरी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा डिकॉकच्या कामगिरीवर समाधानी नाहीत.
'राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये क्विंटन डीकॉकने ५२ बॉलमध्ये १५५ च्या स्ट्राईक रेटने ८१ रनची खेळी केली. पण ओपनर असलेल्या खेळाडूने जर ५२ बॉल खेळले तर निदान त्याने शतक करणं अपेक्षित आहे. क्विंटन डीकॉकचं शतक झालं असतं, तर मुंबईचा स्कोअर २२० रनच्या आसपास गेला असता आणि राजस्थानविरुद्ध मुंबईचा विजय झाला असता', असं वक्तव्य सेहवागने केलं आहे.
तर अजय जडेजा यानेही या मोसमातल्या क्विंटन डीकॉकच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'क्विंटन डीकॉक पॉवर प्लेमध्ये खेळताना मोठा धोका पत्करतो, पण एवढा धोका पत्करूनही त्याचा स्ट्राईक रेट फार जास्त नसतो. हा धोका पत्करण्याच्या नादात क्विंटन डीकॉक आऊट होतो, असं मत अजय जडेजाने व्यक्त केलं आहे.
राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये क्विंटन डीकॉक मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. आता मुंबईचा सामना आज बंगळुरुविरुद्ध होणार आहे. ओपनर म्हणून मुंबईकडे एव्हिन लुईस आणि बेन कटिंग यांचा पर्याय उपलब्ध आहे.
एव्हिन लुईसने मागच्या मोसमात मुंबईसाठी ओपनरची भूमिका बजावली होती. तर ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये बेन कटिंग ओपनिंगला खेळतो. मागच्या मोसमात एव्हिन लुईसबरोबर सूर्यकुमार यादव ओपनिंगला यायचा. सूर्यकुमार यादवचा पर्यायही रोहितकडे उपलब्ध आहे. या मोसमात आपण ओपनिंगलाच खेळणार असल्याचं रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलं आहे.