हैदराबाद : आयपीएलच्या १२व्या मोसमाची चॅम्पियन मुंबईची टीम ठरली. चेन्नईविरुद्धच्या रोमांचक फायनलमध्ये मुंबईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. आयपीएलच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसनने ८० रनची खेळी करून चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं, पण मलिंगाने शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेऊन मुंबईला चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल जिंकण्याची मुंबईची ही चौथी वेळ आहे. याआधी २०१३, २०१५ आणि २०१७ साली मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. सर्वाधिक आयपीएल जिंकण्याचा विक्रमही मुंबईने २०१९ सालच्या विजयामुळे केला आहे.


आयपीएलच्या या विजयानंतर मुंबईच्या टीमने ड्रेसिंग रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनदरम्यान मुंबई टीमचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने जोरदार निशाणा साधला. 'ऑरेंज आणि पर्पल कॅप काय कामाची? आमच्याकडे तर ट्रॉफी आहे,' असं जयवर्धने म्हणाला.


'आज आपण शेवटपर्यंत सामना सोडला नाही. आपण चुका केल्या, पण तरी आपण पुनरागमन केलं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक संस्कृती तयार करावी लागते. या मोसमात प्रत्येकाने त्यांचं योगदान दिलं आहे. आपल्याकडे ऑरेंज कॅप नाही आणि पर्पल कॅपही नाही, पण आपल्याकडे ही ट्रॉफी आहे,' असं जयवर्धने ड्रेसिंग रूममध्ये टीमला उद्देशून म्हणाला. मुंबई टीमच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.



आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप देऊन गौरवलं जातं. या मोसमात हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरला ऑरेंज कॅप मिळाली. वॉर्नरने १२ मॅचमध्ये ६९.२० ची सरासरी आणि १४३.८६ च्या सरासरीने ६९२ रन केले. यामध्ये १ शतक आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. तर सर्वाधिक विकेट घेतल्यामुळे चेन्नईच्या इम्रान ताहिरला पर्पल कॅप देण्यात आली. ताहिरने १७ मॅचमध्ये १६.५७ ची सरासरी आणि ६.६९ च्या इकोनॉमी रेटने २६ विकेट घेतल्या.