मुंबई : जगभरात मोठं नुकसान करणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतामध्ये एन्ट्री झाली आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे ७४ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा फटका जगातली सगळ्यात मोठी टी-२० लीग असलेल्या आयपीएललाही बसला आहे. कोरोनामुळे आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आयपीएल खेळवायचं का नाही, याचा निर्णय आयोजकांनी घ्यावा, पण सध्यातरी आयपीएल घेऊ नये, असा सल्ला आम्ही देऊ. तरीही त्यांना आयपीएल खेळवायची असेल, तर तो निर्णय त्यांचा असेल', अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. दुसरीकडे आयपीएल खेळवायचं असेल तर प्रेक्षकांशिवाय खेळवा, असं केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला सांगितलं आहे.


कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा रद्द झाली किंवा पुढे ढकलली गेली तर याचा फटका एमएस धोनीला बसणार आहे. धोनी जुलै २०१९ साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर क्रिकेट खेळलेला नाही.


ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनीला खेळायचं असेल, तर त्याला आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असं भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. त्यामुळे आयपीएलच रद्द झाली तर धोनीची कारकिर्द धोक्यात यायची शक्यता आहे.