चेन्नई : २०१९ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलनंतर एमएस धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. काही दिवसांपूर्वी धोनीने रांचीच्या मैदानामध्ये सराव केला. यानंतर धोनी आता पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. ३ मार्चपासून धोनी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सरावाला सुरुवात करणार आहे. धोनीबरोबर सुरेश रैनाही सराव करेल, अशी माहिती आयपीएलच्या चेन्नई टीमचे सीईओ के.एस.विश्वनाथन यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या १३व्या मोसमाची सुरुवात चेन्नई आणि मुंबईच्या मॅचने होणार आहे. २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना रंगेल. आयपीएलच्या तयारीसाठी धोनी २ मार्चला चेन्नईला पोहोचणार आहे. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासून धोनी सराव सुरु करेल. यंदाच्या मोसमातही धोनीच कर्णधार असेल, असं चेन्नईने स्पष्ट केलं आहे. 


यंदाचं आयपीएल हे धोनीसाठी महत्त्वाचं असणार आहे. आयपीएलमधल्या धोनीच्या कामगिरीवरच तो ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप खेळणार का नाही, याविषयी निर्णय होणार आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. 


'आयपीएल'नेच धोनीला ट्रोल केलं, विचारलं 'खेळू शकेल का?'