अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात चांगली सुरुवात झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग चार सामन्यात पराभूत झाला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटच्या लढतीत बंगळुरूचा दिल्ली कॅपिटल संघाने पराभव केला. चांगल्या नेट रनरेटमुळे विराट कोहलीचा संघ आयपीएलमधून बाहेर होता होता वाचला. परंतु अ‍ॅलिमिनेटर सामन्यात पराभव झाला तर पुन्हा एकदा विराटचं चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध जिंकणे हे बंगळुरू संघाचे लक्ष्य आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबाद संघाने अखेरचे सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचं प्लेऑफमध्ये स्थान निश्चित झालं. शेवटच्या चार सामन्यात बंगळुरूचा संघ हरला आहे. सलग पाचव्या पराभवामुळे कर्णधार कोहलीचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग होऊ शकते.


लीग सामन्यात चमकदार कामगिरीनंतर 14 गुण मिळविणाऱ्या बंगळुरू संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. बंगळुरूचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 8 विकेटने पराभव झाला होता. त्यानंतर मुंबई संघाने 5 गडी राखून त्यांचा पराभव केला. हैदराबाद विरुद्ध सामन्यात 5 विकेटने पराभव आणि त्यानंतर दिल्लीकडून 6 विकेटने बंगळुरुचा पराभव झाला आहे.


आज नाणेफेक जिंकण्यासाठी बंगळुरू संघ नक्कीच प्रार्थना करेल. शेवटच्या चार सामन्यात विराट कोहलीचा संघ टार्गेट चेस करण्यात अपयशी ठरला आहे. हैदराबादने शेवटच्या दोन सामन्यांत नंतर बॅटींग करुन विजय मिळवला आहे. मुंबईविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात हैदराबादने 10 गडी राखून मोठा विजय मिळवला आहे.