आयपीएल २०२० : डेव्हिड वॉर्नरकडे हैदराबादचं नेतृत्व
आयपीएलच्या १३व्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
हैदराबाद : आयपीएलच्या १३व्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी हैदराबादने त्यांचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. केन विलियमसनच्याऐवजी डेव्हिड वॉर्नरला हैदराबादचं नेतृत्व देण्यात आलं आहे. हैदराबादने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याची घोषणा केली आहे. सोबत हैदराबादने डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओदेखील शेयर केला आहे.
हैदराबादचं कर्णधारपद दिल्याबद्दल डेव्हिड वॉर्नरने टीमचे आभार मानले आहेत. तसंच मागच्यावर्षी केन विलियमसन आणि भुवनेश्वर कुमार यांनी टीमचं नेतृत्व केल्याबद्दल वॉर्नरने त्यांचेही आभार मानले. यावर्षी हैदराबादला ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असं वॉर्नर या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
मागच्या मोसमात केन विलियमसनकडे हैदराबादच्या टीमची धुरा होती, पण केन विलियमसन दुखापतग्रस्त झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारला ही जबाबदारी देण्यात आली होती.
२९ मार्चला गतविजेती मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगेल. यंदाच्या मोसमात काही बदल करण्यात आले आहेत. शनिवारी होणाऱ्या दोन मॅच यंदा रद्द करण्यात आल्या आहेत.