`शरिराने घरात, पण मनाने वानखेडे स्टेडियमवर`, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं भावनिक ट्विट
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.
मुंबई : देशभरामध्ये कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्याआधीच बीसीसीआयने आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. देशातली सध्याची परिस्थिती बघता १५ एप्रिलपासूनही आयपीएल सुरु होण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव आयपीएलला खूपच मिस करतोय. याबाबतचं ट्विट सूर्यकुमार यादवने केलं आहे. शरिराने मी घरात असलो, तरी मनाने मात्र वानखेडे स्टेडियमवर आहे. हे दिवसही जातील. घरात राहा, सुरक्षित राहा, असं ट्विट सूर्यकुमार यादवने केलं आहे.
२९ मार्चपासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार होती. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना होणार होता. आयपीएलप्रमाणेच जगातल्या इतर अनेक मोठ्या स्पर्धाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. यंदाच्या वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी घेतली जाणार आहे.
सूर्यकुमार यादवने २०१२ साली मुंबई इंडियन्सच्या टीमकडून पदार्पण केलं. पण २०१४ हे वर्ष सूर्यकुमार यादवसाठी महत्त्वाचं ठरलं. २०१४ साली सूर्यकुमारने कोलकात्याकडून खेळताना १६ मॅचमध्ये १४०.१७ च्या स्ट्राईक रेटने १६४ रन केले. मुंबई इंडियन्सने डच्चू दिल्यानंतर कोलकात्याने सूर्यकुमार यादवला टीममध्ये स्थान दिलं. २०१४ सालीच कोलकात्याने गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धा जिंकली होती.
२०१८ साली मुंबईने पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवला ३.२ कोटी रुपयांना विकत घेतलं. २०१८ साली सूर्यकुमार यादवने १४ मॅचमध्ये ५१२ रन केले. तर २०१९ साली त्याला १३३.३३ च्या स्ट्राईक रेटने ४२४ रन करता आले. २०१९ सालीही मुंबईने आयपीएल स्पर्धा जिंकली होती.
२०१९-२० च्या रणजी मोसमात सूर्यकुमार यादवने मुंबईच्या टीमचं नेतृत्व केलं. सौराष्ट्रविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमारने शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतरही मॅच ड्रॉ झाली आणि सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये गेली. बंगालविरुद्धच्या फायनलमध्ये पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या आघाडीमुळे सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी पटकावली.