मुंबई :  आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बदल करण्यात आले आहेत. सध्या आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी २९ मार्चपासून वानखेडे स्टेडियमवर आयपीएलला सुरुवात होईल, तर फायनल मॅच २४ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा हा मोसम ५७ दिवस चालणार आहे. म्हणजेच आयपीएलचं प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सची मागणी मान्य करण्यात आल्याचं म्हणावं लागले. एका दिवशी दोन सामने खेळवण्यात येऊ नयेत. तसंच सगळ्या मॅच संध्याकाळी ७.३० वाजता सुरु करावेत, अशी मागणी स्टार स्पोर्ट्सनं केली होती.


आयपीएलशी निगडित असलेल्या व्यक्तीने ५७ दिवस सामने चालतील आणि एका दिवशी एकच मॅच होईल, हे स्पष्ट केलं आहे. पूर्ण कार्यक्रम अजून तयार करण्यात आलेला नाही, पण फायनल २४ मे रोजी खेळवण्यात येईल. २९ मार्चला स्पर्धा सुरु झाल्यामुळे नेहमीच्या ४५ दिवसांपेक्षा जास्तचा वेळ आहे. त्यामुळे एका दिवशी एकच सामना खेळवण्यात येण्याची शक्यता जास्त आहे.  दुपारच्या मॅचसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या कमी असते, तसंच टीआरपीही मिळत नाही, त्यामुळे टीम मालकांनाही दुपारी ४ वाजताच्या मॅच खेळवण्यात जास्त रस नव्हता, असं सूत्रांनी सांगितलं.


आयपीएलचं प्रक्षेपण करणाऱ्या चॅनलने मॅच ७.३० वाजता सुरु करावी, यासाठी आग्रह धरला होता. टीआरपी हा नक्कीच मुद्दा आहे, पण बाकीच्या गोष्टीही आहेत. मागच्या मोसमात मॅच रात्री किती उशीरा संपल्या, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये यायचे, त्यांच्यासाठी रात्री उशीरा घरी जाणं कठीण व्हायचं. याबाबत चर्चा झाली आहे आणि मॅच ७.३० वाजता सुरु करण्याचं ठरवण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.


काही टीमना मॅच लवकर सुरु करण्याबाबत आक्षेप होता. सामना सुरु व्हायच्या वेळी प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचणं मुश्किल आहे, कारण मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु सारख्या शहरांमध्ये ट्रॅफिक असतो. ६ वाजता ऑफिस सुटल्यानंतर प्रेक्षक ७.३० च्याआधी स्टेडियममध्ये कसे पोहोचतील? वेळ बदलण्याआधी या गोष्टींचा विचार करायला हवा, असं टीम मालकांनी सांगितल्याचं वक्तव्य सुत्रांनी केलं आहे.