IPL 2020 : आम्ही योग्य वेळी वापसी केली - जेसन होल्डर
आरसीबीचा पराभव केल्यानंतर होल्डरची प्रतिक्रिया
दुबई : आयपीएल 2020 च्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीविरुद्ध जेसन होल्डरने हैदराबादकडून चांगली कामगिरी केली. आधी गोलंदाजी आणि त्यानंतर त्याने केन विल्यमसनबरोबर 24 धावांची नाबाद खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने 4 ओव्हरमध्ये त्याने 25 रन देत ३ विकेट घेतले. या विजयानंतर जेसन होल्डरने म्हटलं की, 'टीमने योग्य वेळी वापसी करत विजय नोंदविला.'
चांगल्या कामगिरीनंतर होल्डर म्हणाला की, 'आम्ही या सामन्यात आमची रणनीती योग्य प्रकारे राबविली. आम्ही सहकारी खेळाडूंशी बरेच काही बोललो आणि सामन्यादरम्यान रणनीती कशी अंमलात आणता यावर हे पूर्णपणे अवलंबून असते. पहिल्या डावात आमच्या गोलंदाजांच्या नेतृत्वात शानदार खेळ झाला.'
तो पुढे म्हणाला की, 'या क्षणी आमचे मनोबल खूपच उंचावले आहे कारण या मोसमातील दुसर्या टप्प्यात आम्ही चांगला खेळ दाखविला आहे. आम्ही योग्य वेळी चांगला खेळ खेळत आहोत आणि उत्कृष्ट लयमध्ये आहोत. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे खेळाडू पुढे आले आणि त्यांनी जबाबदारी पार पाडली आणि उत्कृष्ट प्रदर्शन केले.'
गोलंदाजीबद्दल बोलताना जेसन होल्डर म्हणाला की, मी नेटवर बॉलिंगचा सराव केला. गेल्या काही वर्षात मी दुखापतग्रस्त झालो. यामुळे माझा खेळावर परिणाम झाला आणि यामुळे मी खूपच कमी गोलंदाजी करू शकलो. मला खांद्याला दुखापत झाली होती आणि मला शस्त्रक्रिया करावी लागली, म्हणून मी खूप मेहनत घेतली.'
होल्डर म्हणतो की, 'संदीप शर्मा चांगला बॉल स्पिन करतो. टी नटराजनमध्ये बरीच विविधता आहे, तर रशीद हा जागतिक स्तरावरचा फिरकीपटू आहे आणि कर्णधार वॉर्नरने नदीमचा योग्य वापर केला आहे.'