IPL Auction : आयपीएल लिलावात विक्री न झालेल्या युसुफचं इरफानकडून सांत्वन
आयपीएल २०२० साठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला.
मुंबई : आयपीएल २०२० साठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली, तर काही दिग्गज खेळाडूंच्या पदरी निराशा आली. युसुफ पठाणही यातलाच एक आहे. युसुफ पठाणवर कोणत्याच टीमने बोली लावली नाही. लिलाव न झालेल्या युसुफ पठाणचं त्याचा भाऊ इरफान पठाणकडून सांत्वन करण्यात आलं आहे.
'या छोट्या-मोठ्या घटना तुझी कारकिर्द ठरवू शकत नाहीत. तुझी कारकिर्द शानदार राहिली. तू खऱ्या अर्थाने मॅच जिंकवून देणारा खेळाडू आहेस. नेहमीच तुझ्यावर प्रेम करतो लाला', असं ट्विट इरफान पठाणने केलं आहे. या ट्विटसोबत इरफान पठाणने एक फोटोही ट्विट केला आहे. या फोटोमध्ये इरफान पठाण युसुफच्या खांद्यावर आहे. इरफानच्या हातात तिरंगाही आहे. २००७ टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जल्लोष करतानाचा हा फोटो आहे. या मॅचमध्ये इरफान आणि युसुफ खेळले होते.
यंदाच्या लिलावात युसुफ पठाणची बेस प्राईज १ कोटी रुपये एवढी होती. पण १७४ आयपीएल मॅच खेळणाऱ्या युसुफला कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही. युसुफने आयपीएल कारकिर्दीत २,२४१ रन केले आणि ४२ विकेट घेतल्या.
युसुफ प्रमाणेच चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, मार्टिन गप्टील, कॉलिन मुन्रो, एव्हिन लुईस, कार्लोस ब्रॅथवेट, शाय होप, टीम साऊदी, एडम झम्पा, अल्जारी जोसेफ, मुस्तफिजूर रहमान, मुशफिकुर रहीम, हेनरीच क्लासेन, नमन ओझा या खेळाडूंवरही कोणीच बोली लावली नाही.