IPL 2021 | टीम दबावात असताना धोनी अशी मदत करतो, ऋतुराज गायकवाडकडून `कॅप्टन कूल`चं कौतुक
चेन्नईकडून (CSK) खेळणारा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सातत्याने धमाकेदार खेळी करतोय.
अबुधाबी : चेन्नईकडून (CSK) खेळणारा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सातत्याने धमाकेदार खेळी करतोय. कोलकाता (CSK vs KKR) विरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुराजने 40 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिससोबत (Faf Du Plesis) 73 धावांची सलामी भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून दिली. चेन्नईने कोलकाताचा शेवटच्या चेंडूवर एक धाव काढत थरारक विजय मिळवला. यासह चेन्नईने पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं. (ipl 2021 cks vs kkr Captain Mahendra Singh Dhoni calm demeanor helps the team to overcome whenever it feels pressure said ruturaj gaikwad)
ऋतुराजने 'कॅप्टन कूल' (Captain Cool) महेंद्रसिंह धोनीचं (Mahendra Singh Dhoni) कौतुक केलंय. धोनीच्या शांत स्वभावाचा टीमला कशाप्रकारे फायदा होतो, याबाबतचं रहस्य ऋतुराजने उलगडून सांगितलंय.
ऋतुराज काय म्हणाला?
"जेव्हा आम्ही विजयी आव्हानाचं पाठलाग करतो तेव्हा सलामी जोडीकडून चांगल्या सुरुवाचीती अपेक्षा असते. सलामी जोडीचं मैदानात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं. जर मी किंवा फॅफ डु प्लेसीसपैकी कोणीही 13 व्या ओव्हरपर्यंत मैदानात राहिलो असतो, तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला नसता",असं ऋतुराजने स्पष्ट केलं.
"संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांना दबावात्मक स्थितीवर नियंत्रण कसं मिळवायचं हे त्यांना माहिती आहे. धोनी फार शांत स्वभावाचा आहे. टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दबावात खेळण्याचा अनुभव आहे. दबावाच्या क्षणी हे सर्व खेळाडू शांत असतात. त्यांना माहिती असतं की आपण सामना जिंकू", असंही ऋतुराजने नमूद केलं.
...म्हणून धोनीला 'कॅप्टन कूल' म्हणतात
याआधीही धोनीच्या शांत स्वभावाचा प्रत्यय क्रिकेट चाहत्यांना आला आहे. अगदी हातातून निसटलेला सामना धोनी माईंड गेमने आपल्या बाजूने फिरवतो. धोनी दबावात खेळाडूंवर आरडाओरडा करत नाही किंवा संतापतही नाही. खेळाडूंना समजावून सांगतो. त्यांना विश्वासात घेतो.
खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने प्लॅन करण्याचं स्वातंत्र्य देतो. त्यामुळे खेळाडूही त्यांच्या पद्धतीने रणनिती करतात आणि त्यात ते यशस्वीही ठरतात. कॅप्टनकडून मिळणाऱ्या या सपोर्टमुळे अनेकदा खेळाडूही धोनीसोबत विश्वासाने वावरतात. धोनीच्या या स्वभाव गुणाचा फायदा खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरी सुधारण्यातही होतो. तसेच खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचा रुपांतर विजयात होतं.
दरम्यान चेन्नईने कोलकाताला पराभूत करत पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईने या मोसमात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. चेन्नईने यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा पुढचा सामना हा 30 सप्टेंबरला हैदराबाद विरुद्ध असणार आहे.