IPLसाठी उरले 24 तास, 4 खेळाडू, ग्राऊंड स्टाफ, ब्रॉडकास्टिंग टीमवर कोरोनाचं संकट
IPL सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कोरोनामुळे चिंता वाढत आहे.
मुंबई: IPL2021 चौदाव्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीतही कोरोनाचा धोका अधिक वाढत असल्याचं दिसत आहे. खेळाडूच नाही तर ग्राऊंड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीममधील सदस्य देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.
पुढच्य़ा काही तासांनंतर, जगातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. एकीकडे देशात 1.15 कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये खेळणारे अनेक खेळाडू, ग्राऊंड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीमचे सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.
कोहलीच्या टीममधील सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कलला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याने कोरोनावर मात केली असून पुन्हा एकदा खेळण्यासाठी तो संघासोबत आला आहे. देवदत्तचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता तो संघात खेळण्यासाठी समाविष्ट झाला आहे. दुसरीकडे डेनियल सॅमचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं पुन्हा एकदा कोहलीचं टेन्शन वाढलं आहे.
दिल्ली कॅपिटल्समध्ये अक्षर पटेलचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं ऋषभ पंतचं टेन्शन वाढलं आहे. अक्षर पटेल पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची कमतरता संघात जाणवणार आहे.
माजी विकेटकीपर किरण मोरे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्य़ानं मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट 6 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे.
दुसरीकडे वानखेडे स्टेडियमवरचा ग्राऊड स्टाफ एप्रिलच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. ग्राऊंड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीमचे सदस्यांमध्येही चिंता वाढली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील 11 ग्राऊंड स्टाफचे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तर ब्रॉडकास्टिंग टीमधील 14 सदस्य़ांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे IPLवरील कोरोनाचं संकट कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 59,907 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 30,296 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.