यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यात आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघामध्ंये चढाओढ पाहायला मिळतेय. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या 3 सामन्यात सलग पराभव झाला. त्यानंतर पंजाबवर विजय मिळवला. यामुळे मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान कायम आहे. असं असताना आता मुंबईसाठी वाईट बातमी आली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा ऑलराऊंडर अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) दुखापतीमुळे 14 व्या मोसमातून बाहेर झाला आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. (IPL 2021 Mumbai Indians Sachin Tendulkars son Arjun Tendulkar out due to injury Simarjeet Singh takes his place)
 
अर्जूनला या मोसमात एकही सामना न खेळता स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे . सचिनचा मुलगा कसा खेळतो, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अर्जुन या मोसमाच्या अखेरपर्यंत एकदातरी खेळताना दिसेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याआधीच त्याला दुखापतीने हेरलं. त्यामुळे अर्जुनला आता आयपीएल डेब्यूसाठी पुढचं वर्ष उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे. 


अर्जून टीममध्ये बॅट्समन्सना नेट बॉलर म्हणून बॉलिंग करत होता. अर्जूनला मुंबईने 20 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. दरम्यान अर्जूनच्या जागी आता बदली खेळाडू म्हणून वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंह (Simarjeet Singh) याला संधी देण्यात आली आहे.