मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 56 लीग सामने खेळले गेले आहेत. यासह, प्ले ऑफसाठी चार संघांची नावेही उघड झाली आहेत. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स हे चार संघ आता क्वालिफायर आणि एलिमिनेटरसाठी खेळतील. या मोसमात आता आणखी चार सामने शिल्लक राहिले आहेत जे अंतिम फेरीतील आहेत. तर आतापर्यंत जांभळा म्हणजेच पर्पल कॅप(सर्वाधिक विकेट) आणि ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) च्या स्पर्धकांवर एक नजर टाकूया.


पर्पल कॅपचे दावेदार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. हर्षल पटेल: प्रथम लीग स्टेजमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलले तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेल अजूनही आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान, त्याची सरासरी देखील 14.66 आहे.


हर्षलने हॅटट्रिकसह पाच विकेट्सही घेतल्या आहेत. हर्षल आयपीएलमध्ये इतिहास रचण्यापासून फक्त तीन विकेट दूर आहे. तो एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा ड्वेन ब्राव्होचा (32) विक्रम तीन विकेट घेऊन मोडू शकतो. ब्राव्होने 2013 मध्ये एका सिजनमध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या. हर्षलची टीम आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचली आहे, त्यामुळे हर्षलला किमान एक सामना खेळण्याची संधी आहे, ज्यामुळे तो आपल्या नावे नवा रेकॉर्ड करु शकतो.


2. आवेश खान: दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज अवेश खान या मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अवेशने आतापर्यंत 14 सामन्यांत 22 विकेट्स घेतल्या आहेत. दिल्लीचा संघ आता आणखी किमान दोन सामने खेळेल. त्यामुळे त्या पहिल्या क्रमांकावर पोहोचून पर्पल कॅप मिळवण्याची संधी आहे. 


3. जसप्रीत बुमराह: मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 14 सामन्यात 21 विकेट घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु मुंबई संघ आत स्पर्धेबाहेर आहे.


4. मोहम्मद शमी: पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील या यादीत आहे. तो 14 सामन्यात 19 विकेट घेऊन चौथ्या स्थानावर आहे. मात्र, त्याचा संघ आता स्पर्धेबाहेर आहे.


5. राशिद खान: सनरायझर्स हैदराबादचा स्टार फिरकीपटू राशिद खान या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. त्याच्या 14 सामन्यात 18 बळी आहेत आणि त्याचा संघही आता सीजन बाहेर आहे.


ऑरेंज कॅप स्पर्धक


1. केएल राहुल: यावेळीही पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल लीगच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल 2020 ऑरेंज कॅप विजेता राहुल देखील यावेळी 600 पेक्षा जास्त धावांसह अव्वल आहे. राहुलने या हंगामात 13 सामन्यांमध्ये 62.60 च्या सरासरीने आणि 138.80 च्या स्ट्राईक रेटने 626 धावा केल्या आहेत.


यावेळी तो सर्वाधिक षटकार (30) आणि सर्वाधिक अर्धशतके (6) करणारा खेळाडू राहिला आहे. मात्र, त्याचा संघ आता स्पर्धेबाहेर आहे.


2. फाफ डु प्लेसिस: चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फाफ डु प्लेसिस सर्वाधिक धावांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 45.50 च्या सरासरीने आणि 137.5 च्या स्ट्राइक रेटने 546 धावा केल्या आहेत. त्याच्या संघ किमान दोन सामने खेळू शकतो ज्यामुळे त्याच्याकडे पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे.


3. शिखर धवन: दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन 14 सामन्यांत 544 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा संघ प्लेऑफमध्येही आहे आणि आणखी किमान दोन सामने तो खेळू शकतो.


4. ऋतुराज गायकवाड: चेन्नई सुपर किंग्जचा आणखी एक सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा या यादीत समावेश आहे. ऋतुराजने 14 सामन्यांमध्ये 533 धावा केल्या आहेत आणि त्याच्याकडे अजून किमान दोन सामने खेळण्याची संधी आहे.


5. ग्लेन मॅक्सवेल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल या यादीत पाचव्या स्थानावर आहे. मॅक्सवेल 14 सामन्यांत 498 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचा संघ किमान एक सामना तरी खेळेल.