IPL 2021 SRH vs DC : सुपर ओव्हरपर्यंत पोहोचूनही हैदराबादच्या पदरी पराभव
हैदराबाद संघाला चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाने पॉईंट टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे.
मुंबई: दिल्ली विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद झालेल्या रोमांचक सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना टफ फाईट देताना दिसले. त्यामुळे सामना सुपरओव्हरपर्यंत गेला. या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली संघाने पुन्हा एकदा बाजी मारत सामन्यावर आपला कब्जा केला आहे. तर हैदराबाद संघाच्या पदरात पुन्हा एकदा पराभव आला. हैदराबाद संघाने सुपरओव्हरमध्ये 8 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करत दिल्लीने सामना आपल्या खिशात घातला आहे.
हैदराबाद संघाला चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाने पॉईंट टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे.
हैदराबाद संघाला सुपर ओव्हरपर्यंत पोहोचवण्यात जगदीश सुचितचा मोठा वाटा आहे. त्याने 16 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार ठोकत 16 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. त्यामध्ये संघाने विल्यमसनच्या चार आणि सुचितच्या षटकारासह 15 धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये पहिलाच सामना टाय झाल्याची घटना घडली.
दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी कोविड 19 वर मात करून आलेल्या अक्षर पटेलकडे सोपविली. या सुपरओव्हरमध्ये त्याने दोन विकेट्स घेऊन दिल्लीला मोठा विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि विल्यमसन यांनी एकत्रितपणे सात धावा केल्या.
हैदराबादकडून सुपर ओव्हरमध्ये रशीद खानने गोलंदाजी केली. त्यावेळी पंत आणि धवनने मिळून 8 धावांचं लक्ष्य गाठत दिल्ली संघाला विजय मिळवून दिला आहे. पृथ्वी शॉला मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं आहे.