मुंबई: देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दुसरीकडे मनोरंजन आणि IPL विश्वातही कोरोनाचं थैमान सुरू झालं आहे. IPLमध्ये एकामागे एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्यानंतर IPL तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय BCCIने घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCIने सगळ्या खेळाडूंना कुटुंबासह आपल्या घरी जाण्याच्या सूचना दिल्या. इंग्लंडचे 8 खेळाडू सुखरूप आपल्या घरी पोहोचले आहेत. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना घरी पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलिया सरकारनं भारतातून ऑस्ट्रेलियात येण्याची बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर एकतर तुरुंगवास अथवा दंड भरण्याची शिक्षा होऊ शकते असं स्थानिक मीडियाचं म्हणणं आहे. 


इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्ज, ख्रिस वॉक्स, मोईन अली आणि जेसन रॉय लंडनमध्ये दाखल झाले आहेत आणि दहा दिवस एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहणार आहेत. त्यानंतर आपल्या घरी परतणार आहेत. 


दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे खेळडू दिल्लीमध्ये एका ठिकाणी भेटून तिथून विमानाने मालदीवला जाणार आहेत. तिथे क्वारंटाइनचा काळ पूर्ण करून ते ऑस्ट्रेलियामध्ये जातील. 


ऑस्ट्रेलियाने 15 मेपर्यंत भारतातून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी IPLमध्ये खेळाणाऱ्या खेळाडूंना सवलत देण्यास नकार दिला आहे. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही सरकारकडून कोणतीही सूट मागितली नाही. त्यामुळे खेळाडूंना घरी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 


सध्या BCCI ऑस्ट्रेलियाचे खेळाडू-कोच यांना मालदीव इथे जाण्यासाठी विमानाची तयारी करत आहे. चेन्नईचे बॉलिंग कोच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना भारतातच क्वारंटाइन राहावं लागणार आहे.