मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन हे पुन्हा एकदा यूएईमध्ये (UAE) करण्यात येणार आहेत, याबाबतची माहिती बीसीसीआय (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी (Rajiv Shukla) दिली. बीसीसीआयच्या विशेष बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान हे उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहे. यूएईमध्ये आयपीएल सामन्यांचं किंवा संपूर्ण मोसमाचं आयोजन करण्याची ही एकूण तिसरी वेळ ठरली आहे. याआधी यूएईमध्ये 2 वेळा यशस्वीपणे सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. (ipl 2021 This is the 3rd time UAE has hosted the IPL)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 29 सामन्यांचे यशस्वीरित्या आयोजन केलं गेलं. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे 4 मे ला स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. दरम्यान आता हे 31 सामने यूएईत खेळवण्यात येणार आहेत. कोरोनामुळे स्पर्धा स्थगितीनंतर यूएईमध्ये आयोजन करण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी आयपीएलच्या 13 व्या मोसमात संपूर्ण पर्वांच आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं होतं. 


तर 2014 मध्ये पहिले 20 सामने यूएईमध्ये पार पडले होते. यानंतरचे उर्वरित सर्व सामने हे भारतात खेळवण्यात आले होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणुका होत्या. त्यामुळे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आयपीएलला सुरक्षा पुरवण्यास नकार दिला होता. त्यामुळे हे 20 सामने यूएईला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


यूएईलाच पसंती का?


14 व्या हंगामातील उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी इंग्लंड, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलियाने तयारी दाखवली होती. मात्र, त्यानंतरही नेहमीच दुबईमध्येच का सामने खेळवण्यात येतात, असा प्रश्नही अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला होता. यूएईमध्ये या सामन्यांचे आयोजन करण्यामागे कारणही तसंच आहे. जगभरात कोरोना असतानाही यूएईमध्ये यशस्वीरित्या 13 व्या मोसमाचं आयोजन करण्यात आलं. 


तसेच यूएईमध्ये शारजाह, अबुधाबी आणि दुबई असे 3 स्टेडियम आहेत. स्टेडियम जवळ असल्याने खेळाडूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासात फार वेळ लागत नाही. प्रवासादरम्यान खेळाडूंना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. या आणि अशा कारणांमुळे पुन्हा यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यात येणार आहे.