मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता काही दिवस उरले आहेत. या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मोसमात अहमदाबाद आणि गुजरात (Gujrat Titans) हे दोन नवे संघ असणार आहेत. त्यामुळे क्रिकेटचाहत्यांना आणखी थरार अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा लिलावात (Ipl Mega Auction 2022) अनेक प्रतिभावान खेळाडू हे अनसोल्ड राहिले. आता अशाच एका अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूचं नशिब फळफळलंय. या खेळाडूला अखेर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. हा बॅट्समनने अवघ्या 14 चेंडूत फिफ्टी ठोकण्याचा कारनामा केलाय, यावरुन हा खेळाडू किती घातक आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.  (ipl 2022 gujrat titans signed afghanistan rahmanullah gurbaz as a replacement for the england batter jason roy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्सने इंग्लंडच्या जेसन रॉयच्या (Jason Roy) जागी अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाजला (Rahmanullah Gurbaz) आपल्या गोटात घेतलं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.


विकेटकीपर बॅट्समन असलेल्या गुरबाजने अफगाणिस्तानकडून (Afghanistan) 2019 मध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत गुरबाजने 20 टी 20 सामने खेळला आहे. या 20 सामन्यांमध्ये त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 534 धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे गुरबाज वनडे पदार्पणात शतक ठोकणारा पहिला अफगाणी बॅट्समन आहे. त्याने 2021 मध्ये अबूधाबीत आयर्लंड विरुद्ध हा कारनामा केला होता. 


गुजरात टायटन्सने 50  लाख रुपये मोजून गुरबाजला आपल्यात सामिल करुन घेतलंय. गुरबाजची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. इंग्लंडचा ओपनर बॅट्समन जेसन रॉयने गेल्या महिन्यात बायो-बबलमध्ये राहण्याच्या मुद्द्यावरुन माघार घेतली. गुजरातने जेसनला मेगा ऑक्शनमध्ये 2 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.


14 बॉलमध्ये वेगवान फिफ्टी


दरम्यान गुरबाजने 14 चेंडूत फिफ्टी ठोकण्याचा कारनामा केला होता. गुरबाजने ही कामगिरी दिल्ली बुल्सचं प्रतिनिधित्व करताना  गेल्या वर्षी पार पडलेल्या टी-10 लीगमध्ये केली होती. त्यामुळे गुरबाजकडून या 15 व्या मोसमात अशाच तोडफोड खेळीची अपेक्षा ही गुजरात फ्रँचायजीला असणार आहे.