वेगवान आणि घातक बॉलर जोफ्रा आर्चर IPL 2022 खेळणार?
घातक बॉलर जोफ्रा आर्चर IPL 2022 चे सामने खेळणार की नाही? मुंबई संघाने दिलं उत्तर
मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गेल्या वर्षी राजस्थान संघाकडून खेळत होता. मात्र दुखापतीमुळे त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा यंदाच्या हंगामात जोफ्रा आर्चर खेळणार की नाही याबाबत अनेकांना संभ्रम आहे. मात्र या प्रश्नाचं मुंबई इंडियन्सने ट्वीट करून उत्तर दिलं आहे.
14 व्या हंगामात जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे राजस्थान संघातून बाहेर पडून आपल्या घरी परतला होता. त्यानंतर वन डे सीरिजमधूनही बाहेर पडला होता. जून-जुलैपर्यंत जोफ्रा मैदानात परत येण्याची शक्यता कमी असल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून सांगण्यात आलं होतं.
मेगा ऑक्शनमध्ये जोफ्रा आर्चरने आपलं नाव दिलं होतं. मुंबई संघाने जोफ्राला आपल्या संघात घेतलं आहे. मात्र तो खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता काय होती. 14 मार्च रोजी मुंबई संघाने ट्वीट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
आर्चर पहिला सामने नाही तर नंतरच्या सामन्यांमध्ये भाग घेईल अशी आशा काही जणांना होती. मात्र मुंबई इंडियन्सने आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जोफ्रा आर्चर यंदाच्या हंगामात खेळणार नाही तर पुढच्या हंगामासाठी खेळणार आहे.
मुंबई संघाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या आर्चरच्या मुलाखतीत ही माहिती देण्यात आली आहे. आर्चर अजूनही दुखापतीमधून पूर्ण बरा झाला नाही. त्याच्या उजव्या हातावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आर्चरने आयपीएलचे फक्त 3 सीझन खेळले आहेत. 35 सामन्यात त्याने 46 विकेट्स घेतल्या. जोफ्रा बॉलिंग करत असताना अनेक दिग्गज फलंदाजांनाही घाम फुटतो. जोफ्राला वेगवान आणि सर्वात घातक गोलंदाज म्हणून ओळखलं जातं.