मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता एक एक खेळाडू फ्रान्चायझीमधून माघार घेत असल्याने टेन्शन वाढलं आहे. जोफ्रा आर्चरनेही आपण खेळणार नसल्याचं जाहीर केलं. आता मुंबई पाठोपाठ चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं टेन्शन वाढलं आहे. ऋतुराज गायकवाड आणि दीपक चाहरला गंभीर दुखापत झाल्याने हे दोन्ही आयपीएल खेळणार की नाही याबाबत शंका आहे. याच दरम्यान आणखी एक खेळाडू संघातून बाहेर झाला आहे. 


दक्षिण आफ्रिकेचा स्टार ऑलराऊंडर ड्वेन प्रिटोरियसला CSK ने 50 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केलं होतं. मात्र 23 मार्चपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यासाठी ड्वेनची दक्षिण आफ्रिका संघात निवड झाली आहे. 


बांग्लादेश दौऱ्यानंतर त्याला क्वारंटाइन देखील पूर्ण करायचा आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील काही सामने तो खेळू शकणार नाही. त्याची जर कसोटीसाठी देखील निवड झाली तर तो काही आयपीएलचे सामने खेळू शकणार नाही त्याचा चेन्नई संघाला मोठा फटका बसणार आहे. 


दीपक चाहरला 14 कोटी रुपये देऊन संघात घेण्यात आलं. मात्र तोही दुखापतीमुळे अजून खेळणार की नाही याबाबत शंका आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात नाही मात्र अखेरच्या सामन्यात तो दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयपीएलमधील पहिला आणि चेन्नईचाही पहिला सामना 26 मार्च रोजी असणार आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना होणार आहे. 


चेन्नई संघाने आयपीएलमध्ये चार वेळ ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला आहे. आता यंदा मुंबई संघाचा रेकॉर्ड तोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदा 10 संघ असल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. शिवाय CSK मधून खेळलेले काही चांगले खेळाडू यंदा इतर संघांमधून खेळणार आहेत. त्यामुळे यंदाचे सामने आणखी रंजक असतील असा चाहत्यांनाही विश्वास आहे.