हाय कमांड सक्रिय; सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानींचा MI टीमला फोन
संघाची होणारी पडझड पाहता हाय कमांड, अर्थात नीता अंबानी यांनीच थेट संघातील खेळाडूंचा फोनवरून संपर्क साधला.
IPL 2022 : पाच वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवणारा मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात मात्र गटांगळ्या खाताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये (Mumbai Indians in IPL 2022) मुंबईच्या संघाचा आतापर्यंतचा खेळ पाहता संघ स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघ सातत्यानं अपयशी ठरताना दिसत आहे. (IPL 2022)
परिणामी गुणतालिकेमध्ये संघाचं स्थान चेन्नईच्याही खाली पोहोचलं आहे. आता संकट टळेल, आता टळेल अशी अपेक्षा असतानाच पुन्हा एकदा संघ बंगळुरूच्या हातून पराभूत झाला. संघाची होणारी पडझड पाहता हाय कमांड, अर्थात नीता अंबानी यांनीच थेट संघातील खेळाडूंचा फोनवरून संपर्क साधला.
नीता अंबानीचा फोन, त्यात आपल्या संघाचा होणारा पराभाव ही सर्व परिस्थिती पाहता सहाजिकच खेळाडूंवर कमालीचं दडपण आलं. ड्रेसििंग रुममध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं. पुढे जे घडलं त्याची कुणीही अपेक्षाच केली नव्हती.
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अंबानी यांचा संघाला फोन आला त्यावेळी नेमकं काय झालं हे पाहायला मिळत आहे.
फोन आला आणि....
नीता अंबानी यांनी संघाला रागे भरलं असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही घडलेलं नाही. उलटपक्षी त्यांनी संघाचं मानसिक धैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
'मला तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की आपण सर्वजण पुढे जाऊ. यापुढे आपण फक्त आगेकूच करणार आहोत. आणखी वर जाणार आहोत. आपल्याला एका गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे की आपण जिंकण्यासाठी जात आहोत. यापूर्वीही आपण अशा परिस्थितीतून पुढे गेलो आहोत.
अशाच अडचणी दूर करत आपण विजेतेपदही मिळवलं आहे. तुम्ही एकमेकांची साथ द्याल तेव्हा आपण जिंकू... विश्वास ठेवा... मुंबई इंडियन्स तुम्हाला पाठिंबाच देणार आहे', असं त्या म्हणाल्या.
संघातील खेळाडूंवर प्रचंड दडपण असताना आणि त्यांच्यावर पराभवाचा डोंगर कोसळलेला असताना नीता अंबानी यांचा तो फोन कॉल नक्कीच खेळाडूंचं मनोधैर्य वाढवून गेलं असणार यात शंका नाही.