IPL 2022 : आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) विजयाचं सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. हा सामना जिंकून राजस्थानने 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2008 मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थानने अंतिम फेरी गाठली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिरकीचा बादशाह शेन वॉर्नच्या (Shane Warne) नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ पहिल्या आयपीएलचा चॅम्पियन ठरला होता. आता 14 वर्षांनी राजस्थानने पुन्हा फायनलमध्ये धडक मारली आहे. पण राजस्थानची ही दमदार कामगिरी पाहण्यासाठी आता शेन वॉर्न या जगात नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांकडून शेन वॉर्नच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 


मार्चमध्ये थायलंडमधील एका हॉटेलमध्ये शेन वॉर्न मृतावस्थेत आढळला होता. त्याने अचानक जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला. ऑस्ट्रेलियापासून भारतापर्यंत शेन वॉर्नला अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 


आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनेही  शेन वॉर्नच्या स्मरणार्थ संघाच्या जर्सीच्या कॉलरवर शेन वॉर्नचं नाव लिहिलेलं आहे. इतकंच नाही तर फ्रँचायझीने त्याला 'फर्स्ट रॉयल' ही पदवीही दिली आहे.


राजस्थान संघाने हा संपूर्ण हंगाम शेन वॉर्नला समर्पित केला आहे. सामना जिंकल्यानंतर अनेक खेळाडूंनी शेन वॉर्नच्या आठवणींना उजाळा दिला. दुसरा क्वालिफायर सामना जिंकल्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या जोस बटलरनेही वॉर्नला मानवंदना दिली.


राजस्थानचा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर असताना चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेन वॉर्नच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.