IPLच्या पुढच्या पर्वात CSK संघाची धुरा `या` खेळाडूकडे, सीईओंनी केला खुलासा
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण असेल? याबाबत जगभरातील क्रीडारसिकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
IPL 2023 CSK Captaincy Will Be Mahendra Singh Dhoni Hand: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत जगातील महागड्या स्पर्धांमध्ये गणना होते. एका एका खेळाडूसाठी कोट्यवधींची बोली लागते. त्यामुळे क्रीडापटूंसह क्रीडाप्रेमींच्या आयपीएलकडे नजरा लागून असतात. कोणता खेळाडू कोणत्या संघात खेळणार? संघाचं नेतृत्व कोण करणार? याचे अंदाज बांधले जातात. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण असेल? याबाबत जगभरातील क्रीडारसिकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी चेन्नई संघांची धुरा नव्या खेळाडूकडे असेल असं सांगितलं होतं. पण आता चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याबाबत सांगितलं आहे. आयपीएल चषकावर चारवेळा नाव कोरणाऱ्या संघाचं नेतृत्व महेंद्र सिंह धोनीच्या हाती असेल असे संकेत दिले आहेत.
चेन्नईचा कर्णधार कोण होणार?
सीएसकेच्या सीईओने खुलासा केला आहे की, पुढील वर्षी सीएसकेचा कर्णधार कोण असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढच्या वर्षी चेन्नईचं कर्णधारपद पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या हातात असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण संपूर्ण जगाला धोनीला मैदानावर पाहायचे आहे. धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
धोनीने 2022 आयपीएलच्या सुरुवातीला चेन्नईचे कर्णधारपद सोडले होते. मात्र जडेजा माघार घेतल्यानंतर त्याला पुन्हा एकदा संघाची कमान आपल्या हाती घ्यावी लागली. असं असलं तरी गेल्या दोन सिझनमध्ये धोनीची बॅट हवी तशी तळपली नाही. पण आता धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये थैमान घालताना दिसणार आहे.
आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जडेजा हवी तशी कामगिरी करू शकला नाही. गोलंदाजीसोबत फलंदाजीतही रवींद्र जडेजा अपयशी ठरला. त्याचबरोबर खराब क्षेत्ररक्षणावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. रवींद्र जडेजा आयपीएल 2022 च्या 10 सामन्यांमध्ये 20 च्या सरासरीने केवळ 116 धावा करू शकला. तसेच 7.51 च्या इकॉनॉमी रेटने फक्त पाच विकेट घेऊ शकला. जडेजाने 8 सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते, त्यापैकी फक्त 2 सामने जिंकले, उर्वरित 6 सामन्यात पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत जडेजाला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले.