भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने आयपीएल 2024 आधी मोठा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरने लखनऊ सुपरजायंट्स संघाची साथ सोडली आहे. गौतम गंभीर आता पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघाशी जोडला गेला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे. गौतम गंभीर लखनऊ संघाच्या मेंटॉरची भूमिका निभावत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2023 संपल्यानंतर गौतम गंभीरने केकेआरचा मालक शाहरुख खानची भेट घेतली होती. यानंतरच गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआर संघाशी जोडला जाऊ शकतो असे अंदाज व्यक्त केले जात होते. गौतम गंभीरने नेतृत्व करताना या संघाला आयपीएल चॅम्पिअन बनवलं होतं. 


केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी आज घोषणा केली आहे की, भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआर संघाचा मेंटॉरच्या भूमिकेत परतणार असून, मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यासोबत मिळून काम करेल. 



लखनऊ सुपरजायंट्सची मेंटॉरशिप सोडल्यानंतर गौतम गंभीरने एक भावनिक मेसेजही शेअर केला. यावेळी तो पद सोडताना फार भावूक झाल्याचं दिसलं. 


गौतम गंभीरने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "माझा लखनऊ सुपरजायंट्ससोबतचा प्रवास संपला आहे. मला लखनऊच्या प्रत्येक खेळाडू, कोच, सपोर्ट स्टाफ आणि संघाशी जोडलेल्या प्रत्येकाकडून पाठिंबा मिळाला. लखनऊ संघाचे मालक डॉक्टर संजीव गोयंका यांची मला आभार मानायचे आहेत. लखनऊचा संघ पुढेही चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. संघाला माझ्या शुभेच्छा आहेत".



शाहरुख खानने केलं स्वागत


शाहरुख खानने गौतम गंभीरचं स्वागत केलं आहे. "गौतम नेहमीच कुटुंबाचा भाग राहिला आहे. आमचा कर्णधार आता एका मेंटॉरच्या, एका वेगळ्या भूमिकेत परतला आहे. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती, चंदू सर आणि गौतम गंभीर दोघं मिळून केकेआरसह चांगली कामगिरी करतील," अशी अपेक्षा शाहरुखने व्यक्त केली आहे. 


गौतम गंभीर 2011 ते 2017 दरम्यान केकेआर संघासोबत होता. या काळात केकेआर संघ दोन वेळा चॅम्पिअन ठरला होता. पाचवेळा केकेआर संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. तसंच 2014 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता.