IPL 2023: गुजरातने (Gujarat Titans) पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात सहा गडी राखत विजय मिळवून आपला विजयरथ कायम ठेवला आहे. गुजरातने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 चेंडू राखत हा सामना जिंकला. पंजाबने गुजरातसमोर फक्त 154 धावांचं आव्हान ठेवलेलं असतानाही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला होता. मोहित शर्माने घेतलेल्या दोन विकेट्स आणि शुभमन गिलने 49 चेंडूत 67 धावा केल्याने गुजरातचा विजय शक्य झाला. गुजरातने सामना जिंकल्यानंतर एकीकडे त्यांचं कौतुक होत असताना कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मात्र नाराजी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्याने आपल्या सहकाऱ्यांना इशाराच दिला आहे. त्याने सांगितलं की "खरं सांगायचं तर, आम्ही ज्या स्थितीत होतो ते पाहता सामना इतका अटीतटीचा होणं कौतुकास्पद नाही. या सामन्यात आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं होतं. हेच तर या खेळाचं वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत हा संपत नाही तोवर तो संपला असं म्हणू शकत नाही".


"त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा चर्चा करु. मला वाटतं मधल्या फळीत आम्ही काही जोखीम पत्करु शकतो. आम्ही जोखीम पत्करुन मधील ओव्हर्समध्ये चांगले फटके खेळण्याची गरज आहे. जेणेकरुन सामना इतका अटीतटीचा होणार नाही याची खात्री बाळगता येईल," असंही हार्दिक पांड्याने सांगितलं आहे. विकेट चांगली होती, पण माती कठीण असल्याने बॉल सुकत चालला होता असं हार्दिकने सांगितलं. यावेळी त्याने मध्यमगती गोलंदाज मोहितच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. 


2020 नंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या मोहितने शेवटच्या षटकात फक्त सहा धावा दिल्या. "मोहित आणि जोसेफ आल्यानंतर मला जास्त आश्चर्य वाटलं नव्हतं. त्यांना जबरदस्त गोलंदाजी केली. याचं सर्व श्रेय मोहितला जातं. नेटमध्ये गोलंदाजी करत तो आपल्याला संधी मिळेल याची वाट पाहत होता. आपली वेळ येईल याची त्याला कल्पना होती आणि गुरुवारी ती आली. त्याने फार मेहनत घेतली आहे. त्याने फार संयम बाळगला असून आता त्याची वेळ आहे," असं हार्दिकने म्हटलं. 


सामन्यातील विजयावर बोलताना हार्दिकने म्हटलं की "इतक्या अटीतटीत जिंकणं थोडं पचवणं कठीण आहे. सामना शेवटच्या ओव्हरमध्ये नेऊन जाणं या गोष्टीचा मी चाहता नाही". दरम्यान दुसरीकडे पंजाबचा कर्णधार शिखर धवनने संघाच्या पराभवानंतर नाराजी जाहीर करत फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचं म्हटलं. 


"आम्ही जास्त धावा करु शकलो नाही. आम्ही पुढे जाताना ही चूक सुधारली पाहिजे. जर संघ फक्त 56 चेंडू खेळत असेल तर तुम्ही सामना हारणार," असं धवनने म्हटलं आहे. लवकर गडी बाद होणं हे तुम्हाला बॅकफूटवर आणतं आणि यावर काम करणं गरजेचं आहे असंही धवनने सांगितलं. 


प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या मोहितने, आपण गोलंदाजीत व्हेरिएशन आणण्याचं ठरवलं होतं. हार्दिक पांड्याशी मी चर्चा केली होती आणि त्याचं फळ मिळालं असं सांगितलं.