Gujarat Titans : आयपीएलच्या 16व्या (IPL 2023) मोसमात गुजरात टायटन्सचा (GT) संघ तिसऱ्या विजयासह प्रतिस्पर्धी संघांना तगडी टक्कर देत आहे. गेल्याच मोसमात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या संघाने आयपीएल 2022च्या ट्रॉफीवर नाव कोरले होते. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली हा संघ चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने (MI) हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला रिटेन केले नव्हते. त्यानंतर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समध्ये गेला होता. सुरुवातीला गुजरातसोबत नकार देणारा पांड्या एका फोन कॉलमुळे नव्याकोऱ्या संघासोबत जोडला गेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलच्या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि पदार्पणातच त्याने चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. पहिल्याच प्रयत्नात हा संघ विजेता ठरेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्या जोडीने ही गोष्ट शक्य करून दाखवली. यानंतरच पांड्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदाचीही संधी मिळाली. मात्र, त्याआधी हार्दिक गुजरातमध्ये येण्यास तयार नव्हता.


मला लखनऊ सुपर जायंट्सकडूनही ऑफर मिळाली होती. त्यानंतर मला गुजरातचा कर्णधार बनण्यास सांगण्यात आले. मला कर्णधार व्हायचे नव्हते पण आशिष नेहराच्या फोननंतर मी माझा विचार बदलला, असे हार्दिकने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. 'मला त्या आयपीएलमध्ये आणखी एका फ्रँचायझीकडून ऑफर आली होती. त्यावेळी माझी अशी परिस्थिती होती की मला ओळखणाऱ्या व्यक्तीसोबत काम करायचे आहे. कारण जे मला ओळखतात तेच मला समजून घेतात. त्यामुळे जेव्हा मला आशु पा याच्या (आशिष नेहरा) संघामध्ये सामील होण्याची संधी मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला, असे हार्दिकने सांगितले.


"मी आशिष नेहराला सांगितले की जर तो नसता तर मी संघात सामील झालो नसतो. तो एक असा माणूस आहे जो मला समजून घेतो आणि त्याच्यासोबत काम करणे सोपे आहे. कॉल कट केल्यानंतर आशिषने मला मेसेज केला आणि सांगितले की जर तो गुजरातमध्ये सामील झाला तर तो कर्णधार होईल. मला हे पाहून खूप आश्चर्य वाटले. म्हणून मी आशिष नेहराला निराश केले नाही आणि संघात सामील झालो," असेही हार्दिकने सांगितले.


दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पंजाब किंग्सचा (Punjab Kings) त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला आहे. गुरजरातने सहा विकेटने सामना जिंकल्यामुळे पंजाबचा दुसरा पराभव झाला आहे. शुभमन गिल हा गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. पंजाबने दिलेले 154 धावांचे लक्ष्य गुजरातने 19.5 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील गुजरात टायटन्सचा हा तिसरा विजय ठरला आहे.