GT vs KKR: सलग 5 सिक्स खाणाऱ्या यश दयाल ची आईने सोडलं जेवण, वडिलांनी मुलाला फोन करुन सांगितलं...
IPL 2023 GT vs KKR: आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचा फलंदाज रिंकू सिंह ने गुजरातच्या यश दयालच्या एकाच षटकात सलग 5 षटकार मारत विजय मिळवून दिला. आज दोन दिवसांनंतरही या सामन्याची चर्चा होतेय, तर यशच्या कुटुंबियांनीही यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Yash Dayal: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात 9 एप्रिलला झालेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यानचा (Kolkata Knight Riders) सामना आयपीएलच्या इतिहासात कोरला जाईल. आयपीएलमध्ये (IPL) आतापर्यंत खेळलेल्या चुरशीच्या सामन्यांपैकी हा एक सामना होता. केकेआरला (KKR) शेवटच्या षटकात विजयसाठी 29 धावांची गरज होती. गुजरातचा कर्णधार राशिद खानने (Rashid Khan) शेवटचं षटक टाकण्यासाठी चेंडू युवा गोलंदाज यश दयालच्या (Yash Dayal) हाती सोपवला. पण हे षटक आयपीएलच्या इतिहासातलं सर्वात लक्षात राहणारं षटक ठरलं.
केकेआरच्या रिंकू सिंहने यश(Rinku Singh)च्या एकाच ओव्हरमध्ये सलग पाच षटकार खेचत अशक्य असा विजय मिळवून दिला. या विजयानंतर सर्वत्र रिंकू सिंहचं कौतुक केलं जात आहे. संपूर्ण देश रिंकूच्या फलंदाजीची चर्चा करत असताना दुसरीकडे यश दयालच्या घरचं वातावरण काहीसं वेगळं होतं. यशचे वडील चंद्रपाल दयाल यांनी यावर पहिल्यांदाच प्रतक्रिया दिली आहे. हे सर्व एका वाईट स्वप्ना सारखं होतं. त्या दिवशी यशची आई जेवलीसुद्धा नाही असं चंद्रपाल दयाल यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Yash Dayal Father Reaction)
त्या सामन्यानंतर चंद्रपाल दयाल यांनी यशला फोन करत त्याला पाठिंबा दिला. खेळात अशा घटना होत असतात, निराश होऊ नकोस असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलाला दिला. गुजरात टायटन्सचा पुढचा सामना 13 एप्रिलला मोहालीत पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी आपण स्टेडिअममध्ये उपस्थित राहून चिअर करुन आश्वासनही यशच्या वडीलांनी त्याला दिलं.
विशेष म्हणजे या सामन्यानंतर गुजरात संघानेही यशला पाठिंबा देणारं ट्विट केलं. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यासह संघातील सर्वच खेळाडूंनी यशला साथ दिली. इतकंच नाही तर हॉटेलमध्ये नाचगाणंही झालं, सर्व खेळाडूंनी यशचा उत्साह वाढवला.
फोनवर काय बोलणं झालं?
चंद्रपाल दयाल यांनी रात्री उशीरा यशला फोन करत त्याच्याशी चर्चा केली. काही कारणाने बॉल ग्रिप बसत नव्हती, यॉर्कर मिस होत होता, असं यशने आपल्या वडीलांना सांगितलं. रिंकू आणि यश हे चांगले मित्र आहेत. त्यामुळ यशची गोलंदाजी रिंकूला चांगलीच परिचीत होती. पण तो दिवस यशचा नव्हता असं चंद्रपाल दयाल यांनी आपल्या मुलाला सांगतिलं.
प्रशिक्षकाने व्यक्त केला विश्वास
यशचे प्रशिक्षक अमित पाल यांनी यश नव्या दमाने पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यश चांगला यॉर्कर टाकू शकतो. पण त्या सामन्यात तो काहीसा दबावात होता असं अमित पाल यांनी म्हटलंय. डावखुला वेगवान गोलंदाज यश दयाल उत्तर प्रदेशमध्ये राहाणारा आहे. विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये 14 विकेट घेतल्यानंतर गुजरात टायटन्सने यशची निवड केली.