IPL 2023 Final Match: इंडियन प्रमिअर लिगमधील दुसरा क्वालिफायरचा (ipl 2023 qualifier 2) सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात सुपर टायटन्सच्या संघांमध्ये (mi vs gt qualifier 2) आज (26 मे 2023 रोजी) खेळवला जाणार आहे. या सामन्यामधील विजेता संघ अंतिम फेरीमध्ये 28 मे रोजी याच मैदानात चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघाविरुद्ध अंतिम सामना (IPL 2023 Final) खेळणार आहे. मात्र त्यापूर्वी आजचा कठीण पेपर मुंबई इंडियन्सला सोडवावा लागणार आहे. अंतिम फेरीमध्ये नेमकं कोण जाणार हे आज निश्चित होणार असलं तरी मुंबईचा दरारा इतका आहे की मुंबई अंतिम फेरीत येण्याच्या शक्यतेनेच चेन्नईच्या संघाला धडकी भरली आहे. तसं विधानच चेन्नईच्या चमूमधून करण्यात आलं आहे.


चेन्नई सर्वाधिक वेळा फायनल्समध्ये पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ हा आयपीएलच्या स्पर्धेतील सर्वाधिक सातत्य राखणारा संघ आहे. 16 पर्वांपैकी बंदी घालण्यात आलेली 2 पर्व वगळल्यास खेळलेल्या 14 पर्वांमध्ये तब्बल 10 वेळा चेन्नईच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. मात्र चेन्नईला आजपर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 4 अंतिम सामन्यात यश मिळवून आयपीएलच्या चषकावर नाव कोरता आलं आहे. चेन्नई यंदा आपला आयपीएलचा 10 वा अंतिम सामना खेळणार आहे. दुसरीकडे सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाने 6 फायनल्सचे सामने खेळलेत त्यापैकी 5 वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. म्हणजेच फायनल्समध्ये पोहचल्यानंतर मुंबईचा फायनल्स जिंकण्याचा स्ट्राइक रेट हा चेन्नईपेक्षा अधिक आहे. याच आकडीवारीची चिंता कदाचित चेन्नईला वाटत आहे.


मुंबई फायनल्समध्ये नको...


मुंबई आणि चेन्नईदरम्यान यापूर्वी एकूण 4 आयपीएल फायनल्स खेळवण्यात आल्या आहेत. यापैकी 3 वेळा मुंबई इंडियन्सने चेन्नईवर मात केली आहे. तर केवळ 2010 साली चेन्नईच्या संघाला अंतिम सामन्यात मुंबईवर मात करण्यात यश मिळालं आहे. हेच पाहता चेन्नईच्या संघाच्या प्रशिक्षक टीमचा भाग असलेल्या डेवेन ब्रावोने आपल्याला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पाहण्याची इच्छा नाही असं म्हटलं आहे. "मला मुंबई इंडियन्सची भिती वाटते. नाही खरंच माझं खासगी मत विचाराल तर मला मुंबई (अंतिम सामन्यात) नको आहे. माझा मित्र पोलार्डला हे ठाऊक आहे," असं ब्रावोने स्टार स्पोर्ट्सवर चेन्नई अंतिम सामन्यात पोहचल्यानंतर म्हटलं. ब्रावोची ही प्रतिक्रिया ऐकून मुलाखत घेणाऱ्यालाही हसू आलं.


नंतर केली सारवासारव


मात्र यानंतर ब्रावोने आपण विधान मस्करीत केल्याची सारवासारव केली. "विनोद म्हणून हे बाजूला ठेवून मी सर्व संघांना शुभेच्छा देतो. अंतिम सामन्यात आमच्यासमोर कोणीही असलं तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. मला वाटतं आम्ही नक्कीच जिंकू," असंही ब्रावो म्हणाला.