IPL 2023 News : सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट जगतामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून काही खेळाडूंची नावं आवर्जून घेतली जातात. त्यातलंच एक नाव म्हणजे हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya). फार कमी काळातच हार्दिकनं भारतीय क्रिकेट संघातील आपलं स्थान आणखी भक्कम केलं. नवोदित खेळाडूंच्या यादीतून हा खेळाडू आता अनुभवी खेळाडूंच्या यादीत पोहोचला आहे. असा हा खेळाडू सध्या आय़पीएलमध्ये (IPL Gujrat team) गुजरातच्या संघाचं नेतृत्त्वं करताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशिक्षकपदी असणारा आशिष नेहरा आणि संघाची धुरा सांभाळणारा पांड्या यांच्यामध्ये असणारी सुसूत्रता सध्या आयपीएलमधील इतर संघांची धाकधूक वाढवताना दिसत आहे. इथे एकिकडे संघाच्या कामगिरीच्या बळावर यंदाही हार्दिकच्याच संघाला जेतेपद मिळणार अशी शक्यता वर्तवली जात असताना तिथे त्यानंच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.


Gujrat Titans च्या एका पॉडकास्टमध्ये त्यानं याबाबतचा खुलासा केल आहे, ज्यामुळं अनेकांच्याच नजरा वळताना दिसत आहेत. गुजरातच्या संघात येण्याआधी आपल्याला लखनऊ सुपर जाएंट्स या संघात जाण्याची संधी होती, असं तो म्हणाला आहे. मग, का बरं हार्दिक लखनऊ संघात पोहोचला नाही? तर, एका फोन कॉलमुळं हे गणित बदललं आणि हार्दिक गुजरातसाठी खेळू लागला.


हार्दिक असं म्हणालाय तरी काय?


‘मला दुसऱ्या संघाकडूनही (लखनऊ) फोन आला होता, जो आयपीएलमध्ये एक नवखा संघ आहे. तिथे माझ्याच ओळखीचं कुणीतरी नेतृत्त्वाची धुरा सांभाळत होतं. माझ्यासाठई हे अतिशय महत्त्वाचं होतं. कारण, जिथं मी होतो तिथं मला समोरची व्यक्ती मला ओळखत असेल अशा व्यक्तीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्याची माझी इच्छा होती. माझ्याशी फारशी ओळख नसणाऱ्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन ओळखीच्या व्यक्तींपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीला मी ओळखत असेन तर त्याच्यासोबत काम करण्याची संधी पाहता मी तिथंच जाण्यासाठी उत्सुक होतो’, असं त्यानं स्पष्ट केलं.


हे सर्वकाही सुरु असताना हार्दिकला आशू पा, म्हणजेच आशिष नेहराचा फोन आला. तेव्हा संघाला आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी नव्हती. सगळा गोंधळ, काहीच ठरलेलं नव्हतं. पण, नेहरानं आपण प्रशिक्षक होणार असल्याचं सांगत काहीच ठरलं नाहीये हं... हा इशाराही दिला. इथं पांड्याच्या ओळखीच्या व्यक्तींशी असणाऱ्या समीकरणानं महत्त्वाची भूमिका बजावली.


हेसुद्धा वाचा : Arjun Tendulkar : 'या' दिवशी आणि 'या' टीमविरूद्ध अर्जुन IPL मध्ये डेब्यू करण्याची शक्यता!


दोघांमध्येही चांगला संवाद झाला आणि त्यानंतर नेहरानं पांड्याला एक मेसेज केला, ‘तू तार असलास, तर कर्णधारपद तू सांभाळावस असं मला वाटतं.’ त्याचा हा मेसेज पांड्यासाठी अनपेक्षित होता. तो एका वेगळ्याच दुनियेत गेला, कारण कशाचाही मागे न पळता त्याला ही संधी मिळणार होती. किंबहुना त्याला ही संधी मिळाली आणि त्यानं खऱ्या अर्थानं संधीचं सोनंही केलं.