IPL 2023 Points Table : आयपीएलमध्ये सध्या संघांमध्ये असणारी चुरस चांगलीच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. घरच्या मैदानांवर मिळालेल्या पराभवाटा वचपा काढण्यासाठी अनेक संघ विरोधी संघासाठी नवा सापळा रचत असतानाच काही खेळाडू शांतीत क्रांती करत त्यांच्या खेळाचा दबदबा वाढवताना दिसत आहेत. थोडक्यात आयपीएलच्या यंदाच्या पर्वात आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या बळावर गुणतालिकेत मोठे बदल झाल्याचं स्पष्ट होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच मोहाली येथे पार पडलेल्या सामन्यात मुंबईच्या संघानं पंजाबला नमवलं. दणदणीत विजय मिळवल्यामुळं मुंबईच्या संघाला अतिशय महत्त्वाच्या वळणावर 2 गुण मिळाले आहेत. त्यामुळं संघ सहाव्या स्थानावर पोहोचला असून, जेतेपदाच्या आशा अजूनही पल्लवित आहेत असं म्हणायला हरकत नाही. सध्या 9 सामन्यांतून 10 गुण मिळवत मुंबई सहाव्या तर, पंजाबचा संघ सातव्या स्थानावर आहे. (IPL 2023 news Points Table Orange and Purple Cap leading team latest updates in marathi)


इतर संघांना कोणतं स्थान?


गुणतालिकेत पहिल्या स्थानावर 12 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ असून, त्याखालोखाल दुसऱ्या स्थानार लखनऊ सुपर जाएंट्स, तिसऱ्या स्थानावर चेन्नई, त्यामागोमाग राजस्थान चौथ्या स्थानावर आणि बंगळुरूचा संघ पाचव्या स्थानावर आहे. सहाव्या स्थानी मुंबई, सातव्या स्थानावर पंजाब तर, आठव्या आणि नवव्या स्थानावर अनुक्रमे कोलकाता आणि हैदराबादचे संघ आहेत. दिल्लीच्या संघाला या पर्वात अपेक्षित सूर गवसला नसून हा संघ गुणतालिकेत अगदी शेवटी म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.


हेसुद्धा वाचा : Facebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर


 



यंदाच्या पर्वात सध्यापर्यंत Orange Cap चा मानकरी बंगळुरूच्या संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस असून, गोलंदाजीच्या बाबतीत Purple Cap गुजरातच्या संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडे आहे.


मुंबईला विजयाचा सूर गवसला?


पंजाबनं दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघातील ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विजय हिसकावून आणला. त्यामुळं आता मुंबईच्या संघाला विजयाचा सूर गवसल्याचीच प्रतिक्रिया क्रीडाप्रेमी देत आहेत. असं असलं तरीही मुंबई गोलंदाजी करत असताना 200 हून अधिक धावांचं आव्हान मिळण्याची ही यंदाच्या पर्वातील चौथी वेळ. त्यामुळं ही चिंतेची बाब असल्याचं म्हणज या मार्गानं काम करण्याची गरज असल्याची वस्तुस्थिती संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या रोहित शर्मा यानं स्वीकारली. गोलंदाजांची फळी आणखी सुधारत विरोधी संघाची धावसंख्या रोखून धरण्यासाठी आता Mumbai Indians काय आणि कसं काम करतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.