IPL Ticket Advisory: इंडियन प्रीमियर लीगचे सामने 31 मार्चपासून सुरु झाले आहेत. यंदाच्या पर्वाची सुरुवात गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्याने झाली. हा सामना गुजरातने जिंकला. आयपीएलच्या सामन्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक मैदानांमध्ये चाहत्यांची हजारोंच्या संख्येनं गर्दी पहायला मिळत आहे. असं असतानाच आयपीएल पहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना एक खास सल्ला दिला आहे. दिल्ली, मोहाली, हैदराबाद आणि अहमदाबादमधील सामन्यांदरम्यान राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विरोध करणारे बॅनर्स घेऊन मैदानात जाण्याचा प्रयत्न करु नये असं म्हटलं आहे. असे बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन मैदानात प्रवेश करण्याची परवानगी नाही असं सांगण्यात आलं आहे.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएम इनसायडरच्या माध्यमातून आयपीएलच्या सामन्यांची तिकीट विक्री केली जात आहे. या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स इलेव्हन आणि राजस्थान रॉयल्स या 7 सामन्यांची तिकीट विक्री केली जात आहे. याच कंपनीने तिकीट विक्रीसंदर्भातील प्रतिबंधित सामन्यांची यादी जारी केली आहे. यापैकी एक नियम सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या बॅनर्ससंबंधित आहे. या कंपनीने वरील सर्व आयपीएल संघांच्या घरच्या मैदानांवरील तिकीट विक्रीसंदर्भातील अधिकार मिळवले असून त्यांनी सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी काय घेऊन यावे आणि काय नाही यासंदर्भातील यादीच जारी केली आहे. सामान्यपणे यासंदर्भात कंपन्यांना बीसीसीआयकडून यासंदर्भातील सल्ला दिला जातो. ही स्पर्धा कोणत्याही प्रकारच्या संवेदनशील राजकीय किंवा धोरणात्मक मुद्द्यांच्या प्रचाराला परवानगी देत नाही.


अधिकारी काय म्हणतात?


तिकिटांसंदर्भातील नियम हे पूर्णपणे फ्रेंचायझीवर अवलंबून असतात. क्रिकेट मंडळं केवळ सूत्रधार असून ते केवळ मैदानं निश्चित करतात. तिकीटांबद्दलच्या नियमांमध्ये मैदान व्यवस्थापनाची काहीही भूमिका नसते, असं दिल्ली तसेच जिल्हा क्रिकेट संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  स्पष्ट केलं आहे. आयपीएल फ्रेंचायजीच्या एका प्रतिनिधीने निर्बंधांसंदर्भातील कोणतेही सल्ले बीसीसीआयकडून दिले जात नाहीत, असं म्हटलं.