IPL 2023 Playoff Race: आयपीएल (Indian Premiere League) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्लेऑफमध्ये (Playoff) आता कोणते चार संघ स्थान मिळवणार हे चित्र आता जवळपास स्पष्ट होत आहे. सध्या फक्त गुजरात टायटन्स संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. हैदराबादचा पराभव केल्याने गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान सध्या आयपीएलमध्ये नेमकं काय चित्र आहे हे समजून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये आता 8 सामने शिल्लक आहेत. या स्पर्धेतून दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ बाहेर पडले आहेत. गुजरातने सोमवारी झालेल्या सामन्यात सनराजर्स हैदराबादचा 34 धावांनी पराभव करत प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं. यासह प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे. दरम्यान, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स यांच्यातील स्पर्धा अद्याप कायम आहे. 


आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊमध्ये सामना होणार आहे. जर मुंबईने हा सामना जिंकला तर ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. आणि जर लखनऊने मोठ्या फरकाने हा सामना जिंकला तर त्यांना गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. 



दुसरीकडे चेन्नईने 13 सामने खेळले असून 15 गुण आहेत. त्यांचा रनरेट 0.381 असून पुढील सामना दिल्लीशी होणार आहे. चेन्नईचा कोलकाताविरोधात पराभव झाल्याने प्लेऑफचं समीकरण बिघडलं आहे. आता दिल्लीशी त्यांचा सामना होणार असून हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. दिल्लीविरोधात पराभव झाल्यास चेन्नई स्पर्धेतून बाहेर होईल. पण जर विजयी झाले तर गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर येतील.


बंगळुरुने 12 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत. पुढील दोन सामन्यात ते हैदराबाद आणि गुजरातशी भिडणार आहेत. गेल्या सामन्यात त्यांनी राजस्थानचा दणदणीत पराभव करत गुणतालिकेत पाचवं स्थान गाठलं होतं. बंगळुरुला पुढील दोन्ही सामने जिंकण्याची गरज आहे. 16 गुण झाल्यानंतरही त्यांना इतर संघांची कामगिरी आणि रन रेटवर अवलंबून राहावं लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बंगळुरुचा रन रेट मुंबई आणि पंजाबपेक्षा चांगला आहे. जर बंगळुरुने एक सामना हारला तर त्यांचे 14 गुण होतील. अशा स्थितीत रन रेटमध्ये ते इतर संघांना मात देऊ शकतात. 


राजस्थानकडे 13 गुण असून बंगळुरुविरोधात दारुण पराभव होणं त्यांना महाग पडलं आहे. त्यांचा रनरेट 0.633 वरुन 0.140 वर पोहोचली आहे. पण राजस्थानकडे अद्यापही संधी आहे. जर राजस्थानने पंजाबचा पराभव केला तर आशा कायम आहेत. 


पंजाबकडे 12 गुण असून उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास त्यांच्याही प्लेऑफमधील आशा कायम आहे. त्यांना दोन्ही सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवावा लागणार आहे. तर कोलकाताकडे 12 गुण आहेत. चेन्नईचा पराभव केल्यानंतर त्यांच्या प्लेऑफमधील आशा कायम आहेत, पण त्यांना दुसऱ्या संघांच्या खेळीवर अवलंबून राहावं लागणार आहे.