IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) सर्व दहा संघ आता सज्ज झालेत. सर्व संघांची रणनिती तयार झाली असून ट्ऱॉफी पटकावण्यासाठी 31 मार्चपासून प्रत्येक संघ मैदानात उतरेल. दहा संघात 52 दिवस आयपीएलचा थरार रंगेल आणि क्रिकेटप्रेमींना उत्सुकता असेल ती यंदाचा विजेता संघ कोण असेल याची. ज्या संघांना विजेतेपदासाठी दावेदार मानलं जात आहे, त्यात गेल्या हंगामात उपविजेत्या ठरलेल्या राजस्थान रॉयल्सचाही (Rajasthan Royals) समावेश आहे. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला अंडरडॉग संघ म्हणून पाहिलं जात होतं. पण गेल्या हंगामात रॉयल कामगिरी करत राजस्थानने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजेतेपदासाठी राजस्थान दावेदार
2008 मध्ये जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात झाली आणि सर्व संघांना धक्का देत आयपीएल स्पर्धेचा पहिला विजेता होण्याचा मान राजस्थान रॉयल्सने पटकावला. पण यानंतर पुढच्या एकाही हंगामात राजस्थानला जेतेपदाची कामगिरी करता आली नाही. पंधराव्या हंगामात राजस्थानने अंतिम फेरीत धडक मारली. पण हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्ससमोर (Gujrat Titans) संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना करावा लागला. 


राजस्थानची जमेची बाजू
राजस्थानची सर्वात मोठी ताकद आहे ती त्यांची गोलंदाजी. टीम इंडियाचे अनुभवी दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) राजस्थानचे प्रमुख गोलंदाज असतील. भारतीय खेळपट्टीवर अश्विन आणि युजवेंद्र किती धोकादायक ठरु शकतात हे यापूर्वी अनेकवेळा सिद्ध झालं आहे. याशिवाय अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल. 


राजस्थानची गोलंदाजी जितकी अनुभवी आहे तितकीच फलंदाजी देखील आक्रमक आहे. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर प्रमुख फलंदाज आहे. गेल्या हंगामात बटलर ऑरेंज कॅम्पचा मानकरी ठरला होता.  सलामीला बटलरच्या जोडीला यशस्वी जयस्वाल किंवा देवदत्त पडिक्कलची साथ मिळणार आहे. मधल्या फळीत हेटमायर आणि संजू सॅमसनसारखे आक्रमक फलंदाज आहेत. 


फिनिशरची कमी जाणवणार
राजस्थान रॉयल्सची प्रमुख फलंदाजी तगडी असली तरी संघाला फिनिशरची कमी जावण्याची शक्यता आहे. काही हंगामात राहुल तेवतियाने ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. पण त्याच्या जाण्यानंतर संघाला तसा ऑलराऊंडर सापडलेला नाही.  रियान पराग आणि आर अश्विन वेळेप्रसंगी फलंदाज म्हणून उपयुक्त ठरु शकतात, पण योग्य फिनिशर म्हणून ते कितपत यशस्वी ठरतील हे येत्या हंगामात कळेल. 


IPL 2023 राजस्थानचा संघ
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडीक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मेक्कॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल , केसी करिअप्पा