IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premiere League) पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचा (Match Fixing) प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) जलद गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammad Siraj) हे प्रकरण संबंधित असून त्याने बीसीसीआयला (BCCI) याची माहिती दिली आहे. झालं असं की, आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या एका ड्रायव्हरने सट्ट्यात पैसे गमावल्यानंतर मोहम्मद सिराजशी संपर्क साधला. यावेळी त्याने सिराजला जर तू मला संघासंबंधी अंतर्गत माहिती दिली तर मोठी रक्कम देऊ शकतो अशी ऑफर दिली. मात्र सिराजने याची संपूर्ण माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद सिराजने बीसीसीआयला माहिती देतात तात्काळ कारवाई करण्यात आली असून संबंधित चालकाला अटक करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना याबाबत माहिती दिली, दरम्यान मोहम्मद सिराजशी संपर्क साधणारी व्यक्ती कोणी सट्टेबाज नसून, चालक असल्याचं त्यानी सांगितलं आहे. 


बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "सिराजशी संपर्क साधणारा कोणी सट्टेबाज नव्हता. तो हैदराबादचा एक चालक आहे, जो सामन्यांवर सट्टा लावतो. त्याने सट्टेबाजीत बरेच पैसे गमावले होते. यामुळे त्याने संघातील अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी सिराजशी संपर्क साधला होता. सिराजने तात्काळ बीसीसीआयला या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली".


IPL ला मॅच फिक्सिंगचं ग्रहण


याआधीही आयपीएलला मॅच फिक्सिंगचं ग्रहण लागलं आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजीत चंदिला यांना अटक करण्यात आली होती. या तिघांसह चेन्नई सुपरकिंग्जचे गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून बीसीसीआय सतर्क आहे. आयपीएलच्या प्रत्येक संघासोबत भ्रष्टाचार विरोधी पथकाचा एक अधिकारी असतो. हा अधिकारी खेळाडूंसोबतच हॉटेलमध्ये वास्तव्य करतो. तेथील सर्व हालचालींवर तो नजर ठेवून असतो. 


याशिवाय खेळाडूंनाही मॅच फिक्सिंगमध्ये अडकू नये यासाठी काय करावं आणि काय करु नये यासंबंधी प्रशिक्षण दिलं जातं. जर एखाद्या खेळाडूने माहिती दिली नाही तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाते.