IPL 2023: `हा कसला कर्णधार....`, सुनील गावसकरांनी रोहित शर्माला सुनावले खडे बोल; म्हणाले `जमत नसेल तर...`
IPL 2023: चेन्नई सुपरकिंग्जविरोधात (Chennai Super Kings) सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अतिशय खराब फटक्यावर बाद झाल्याने सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत.
IPL 2023: आयपीएलमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात सामना पार पडला. गुणतालिकेत खालच्या स्थानावर असणाऱ्या मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा होता. पण चेन्नईने सहा गडी राखत अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला. चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरल्याने त्याच्यावर टीका होत आहे. दरम्यान, ज्या पद्धतीने बेजबाबदार फटका लगावत रोहित शर्मा (Roiht Sharma) बाद झाला त्यावरुनही टीका होत असून, माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी रोहित शर्मा अत्यंत कडक शब्दांत खडे बोल सुनावले आहेत.
रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तिसऱ्या ओव्हरला दीपक चहरच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि जडेजाच्या हातात सोपा झेल सोपवला. रोहित शर्मा एक धावही करु शकला नाही. जेव्हा रोहित शर्मा बाद झाला तेव्हा संघाची धावसंथ्या 2.5 ओव्हरमध्ये 14 धावांवर 3 गडी बाद अशी होती. रोहित शर्मा मैदानावर आला तेव्हा तो मोठी खेळी करेल अशी आशा व्यक्त होत होती. पण रोहित शर्मा ज्याप्रकार बाद झाला त्यावरुन त्याला टीकेला सामोरं जावं लागत आहे. रोहित शर्मा शून्यावर बाद होण्याची ही 16 वी वेळ होती.
सुनील गावसकर यांनी रोहित शर्मावर टीका केली असून म्हटलं आहे की "तो सामन्यात होता असं अजिबात वाटत नव्हतं. मी कदाचित चुकीचा असेन, पण त्याने खेळलेला शॉट कर्णधाराकडून खेळला जाणं अपेक्षित नव्हतं. संघ अडचणीत असताना कर्णधार चांगली खेळी करत संघाला पुन्हा सामन्यात आणण्याचा प्रयत्न करत असतो. मैदानावर टिकून राहत संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यात त्याने मदत करणं अपेक्षित असतं. पावरप्लेमध्ये दोन गडी बाद झाले आणि तू फॉर्ममध्ये नाहीस".
दरम्यान या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये तब्बल 16 वेळा शून्यावर बाद झाल आहे. गेल्या चार सामन्यात तो 2,3,0,0 इतक्याच धावा करु शकल्या आहे. गावसकरांनी रोहित शर्माला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरुन तो नव्या उमेदीने परत येईल.
"जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये असता तेव्हा तुम्ही स्कूप शॉट खेळणं मी समजू शकतो. पण गेल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेलो असताना, हा शॉट खेळणं मोठा निर्णय आहे. त्यामुळे जर तुम्हाला खेळायचं असेल तर आधी मैदानावर टिकत नंतर एक, दोन धावा काढत मोठे फटके खेळणं अपेक्षित असतं. कदाचित तो अनेक गोष्टींमध्ये गुंतला आहे. त्याने विश्रांती घेणं त्याच्यासाठीच चांगलं आहे. पण हा निर्णय त्याने आणि संघ व्यवस्थापनाने घ्यायचा आहे," असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.