IPL 2023: सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का! अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर
IPL 2023: सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून, हा पूर्ण हंगाम खेळू शकणार नाही आहे.
IPL 2023: सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून, हा पूर्ण हंगाम खेळू शकणार नाही आहे. वॉशिंग्टन सुंदरला गुडघ्याच्या खालील भागात दुखापत (Hamstring Injury) झाली असून त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वॉशिंग्टन सुंदर हंगामाच्या सुरुवातील फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत होता. त्याला दोन्ही ठिकाणी संघर्ष करावा लागत असल्याने आयपीएलध्ये आपली छाप पाडू शकत नव्हता. पण दिल्लीविरोधात झालेल्या सामन्यात त्याला सूर गवसला होता. सुंदरने दिल्लीविरोधातील सामन्यात एका ओव्हरमध्ये तीन गडी बाद केले होते. यामध्ये डेव्हिड वॉर्नरसारखा मोठा फलंदाज होता. याशिवाय सरफराज खान आणि अमन खान यांना त्याने बाद केलं होतं. वॉशिंग्टन सुंदरने चार ओव्हरमध्ये 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
याशिवाय फलंदाजीतही वॉशिंग्टन सुंदरने आपली छाप सोडली होती. त्याने 15 चेंडूत 24 धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेलं होतं. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले होते.
पण आता दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर उर्वरित हंगामात खेळू शकत नाहीत. सनरायजर्स हैदराबादने ट्विट करत ही माहिती दिली आहे. उर्वरित आयपीएलमध्ये वॉशिंग्टन सुंदर खेळू शकणार नाही असं हैदराबादने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वॉशिंग्टनं सुंदरने आयपीएलच्या या हंगामात सात सामने खेळले. यामध्ये त्याने 60 धावा करत तिन विकेटही घेतल्या. चेन्नईविरोधातील पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक ब्रायन लाराने सुंदरने अष्टपैलू कामगिरी करावी अशी अपेक्षा असून, आपण त्याला थोडा वेळ देत असल्याचं म्हटलं होतं.
“गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीकडे वॉशिंग्टन महत्वाचा खेळाडू आहे. परंतु आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे टॉपला खेळू शकतात. वॉशिंग्टनने बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत चांगली अष्टपैलू कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. पण त्याच्यात क्षमता आहे सांगत खेळण्यासाठी वरील स्थानावर आणणं पॅनिक बटण दाबण्यासारखं आहे,” असं लाराने म्हटलं होतं.