IPL 2023 GT vs MI Qualifier 2: आयपीएलचा 16 वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यावर असून फक्त दोन सामनेच शिल्लक आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Channai Super Kings) संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला असून आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात (Gujarat Super Giants) यांच्यातील सामन्यानंतर कोणता संघ चेन्नईशी भिडणार हे स्पष्ट होईल. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभव झालेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन केलं असून आता पुन्ह एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं त्यांचं स्वप्न आहे. संघाला मिळालेल्या यशामुळे खेळाडू सध्या उत्साहात आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तिलक वर्मासह (Tilak Verma) एक प्रँक केला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने बुधवारी झालेल्या सामन्यात लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. हा एलिमिनेटर सामना असल्याने लखनऊचं आव्हान संपुष्टात आलं आणि ते स्पर्धेबाहेर पडले. रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मुंबईने 8 गडी गमावत 182 धावा केल्या. सूर्यकुमार यादव (33), तिलक वर्मा (26) यांनी कॅमरॉन ग्रीनच्या सहाय्याने संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली. कॅमरॉनने 41 धावा केल्या. 


183 धावांचा पाळलाग करताना लखनऊ संघ मात्र ढेपाळताना दिसला. लखनऊ संघ 16 व्या ओव्हरलाच 101 धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो मुंबईचा गोलंदाज आकाश माधवाल. आकाशने 5 धावा देत 5 गडी बाद करत मुंबईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. 


या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाचे खेळाडू उत्साहात आहेत. खांद्यावरील मोठा भार हलका झाल्याने खेळाडू मजा मस्ती करताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सने ट्विटरला खेळाडूंमधील सुरु असलेल्या मस्तीचा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. या व्हिडीओत सूर्यकुमार यादव तिलक वर्मा झोपलेला असताना त्याच्यासह प्रँक करताना दिसत आहे. 


व्हिडीओत तिलक वर्मा झोपलेला असताना सूर्यकुमार यादव लिंबू घेतो आणि त्याच्या तोंडात पिळतो. यानंतर तिलक वर्मालाही जाग येतो. त्याला थोड्या वेळासाठी काय सुरु आहे हे कळत नाही. यावेळी रोहित शर्माची पत्नी रितिका मागच्याच सीटवर बसलेली असतो. हे सर्व पाहून तिला आश्चर्याचा धक्काही बसतो आणि हसूही आवरत नाही.


हा व्हिडीओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने 'चेनसे सोना है तो जाग जाओ' अशी कॅप्शन दिली आहे. 



सामना संपल्यानंतर बोलताना रोहितने लोकांना आम्ही काही गोष्टी करु अशी आशा नव्हती असं म्हटलं आहे. "लोकांना आमच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा नव्हती पण आम्ही सर्व अडथळ्यांना पार केलं आहे," असं रोहित म्हणाला. 


दरम्यान आता मुंबई इंडियन्सचं लक्ष्य गुजरातचा पराभव करत अंतिम सामना गाठण्याचं असेल. 26 मे रोजी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार आहे.