IPL 2023: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची खराब सुरुवात झाली आहे. दिल्लीने पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. तिसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीचा राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 57 धावांनी दारुण पराभव केला. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. राजस्थान रॉयल्सने 199 धावांचं आव्हान दिलेलं असताना, दिल्लीचे फलंदाज मात्र अपयशी ठरले. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केलं, मात्र त्याचा वेग अपेक्षित नसल्याने टीकेला सामोरं जावं लागत आहे. दिल्लीचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) वॉर्नरला कडक शब्दांत सुनावले असून, वेगाने धावा करत अन्यथा आयपीएल खेळू नको असं स्पष्ट सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवागने डेव्हिड वॉर्नरला कडक शब्दांत इशाराच दिला आहे. जर दिल्लीला आयपीएलमध्ये टिकून राहायचं असेल तर वेगाने धावा कराव्या लागतील असं सेहवागने म्हटलं आहे. वॉर्नरने राजस्थानविरोधातील सामन्यात 55 चेंडूत 65 धावा केल्या होत्या. 


"मला वाटतं आता आपण आपण इंग्रजीत त्याला सांगितलं पाहिजे. जेणेकरुन त्याला ते समजेल आणि दुखावेलही. डेव्हिड जर तू ऐकत असशील तर कृपया चांगला खेळ. 25 चेंडूत 50 धावा कर. जैसवालकडून काहीतरी शिक. तो फक्त 25 चेंडूक अर्धशतक करतो. जर तू हे करु शकत नसशील तर आयपीएल खेळू नकोस," असं सेहवागने Cricbuzz शी बोलताना सांगितलं.


"55 ते 60 धावा करण्यापेक्षा जर डेव्हिड 30 धावांवर बाद झाला असता तर संघाच्या फायद्याचं ठरलं असतं. पॉवेल आणि इशानसारखे खेळाडू मैदानात लवकर आले असते आणि कदाचित काहीतरी चांगली कामगिरी केली असती. इतके चांगले खेळाडू असतानाही त्यांना खेळण्यासाठी काहीच संधी दिली नाही," असंही सेहवागने म्हटलं.


माजी भारतीय क्रिकेटर रोहन गावसकरही सेहवागच्या मताशी सहमत आहे. वॉर्नरसारखा खेळाडू ज्याने आयपीएलमध्ये 6000 धावा केल्या आहेत, त्याला असं खेळताना पाहण्याचा विचार करु शकत नाही असं त्याने म्हटलं आहे. 


"जर तुम्ही 8 चेंडूत 8 धावा काढून बाद झालात, तर कोणीही म्हणू शकतं की त्याला ती लय सापडलेली नाही. पण तुम्ही कर्णधार असून तुमच्याकडे अनुभव आहे. सर्वात वेगवान 6000 आयपीएल धावा केल्या असताना अशा प्रकारे खेळण्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. डेव्हिड वॉर्नर कर्णधार नसता तर दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिटायर्ड हर्ट केलं असतं. जर हा युवा भारतीय खेळाडू असता तर त्याच्यासाठी स्पर्धा संपली असती. हा त्याचा शेवटचा सामना ठरला असता. वॉर्नरला या पराभवाची जबाबदारी घ्यावी लागेल,” असं रोहन गावसकरने सांगितलं आहे.