IPL 2024: क्रिकेटप्रेमींना आता आयपीएल स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. 22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत सर्वाधिक चर्चा मुंबई इंडियन्स संघाची आहे. याचं कारण पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. रोहित शर्माच्या खांद्यावरुन कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेत, हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये या निर्णय़ाची सर्वाधिक चर्चा आहे. जर हार्दिक पांड्या संघाला अपेक्षित यश मिळवून देऊ शकला नाही तर त्याला टीकेचा सामना करावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार यानेही मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर टीका केली असून, काही कठोर प्रश्न विचारले आहेत. 


"मुंबई इंडियन्सने फार घाईत निर्णय घेतला आहे का? की हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय योग्य होता?," अशी विचारणा प्रवीण कुमारने केली आहे. प्रवीण कुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. 



"तुम्ही दोन महिने खेळत नाही. तुम्ही आयपीएलच्या दोन महिने आधी जखमी होता. तुम्ही देशासाठी खेळत नाही. तुम्ही स्थानिक क्रिकेटमध्ये राज्यासाठी खेळत नाही आणि थेट आयपीएलमध्ये खेळता. अशाच प्रकारे गोष्टी घडत आहेत. तुम्ही पैसे कमावत असाल तर ठीक आहे, तुम्हाला कोण थांबत आहे? यामध्ये काही चुकीचं नाही. पण तुम्ही राज्य आणि देशासाठी खेळलं पाहिजे. आता लोक फक्त आयपीएलला महत्व देत आहेत," असा संताप प्रवीण कुमारने व्यक्त केला आहे.


यावेळी प्रवीण कुमारने तरुण खेळाडूंना आयपीएलपेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जास्त महत्व देण्याचा सल्ला दिला आहे. तसंच करिअरमध्ये दोन्ही गोष्टींचं संतुलन राखण्यास सांगितलं आहे. 


"मी मागील फार काळापासून हे सांगत आहे. पैसे कमवा, कोण मनाई करत आहे? पैसे कमवायला हवेत, पण असं व्हायला नको की तुम्ही स्थानिक क्रिकेट खेळत आहात आणि देशाला महत्वच देत नाही. ही गोष्ट आता अनेक खेळाडूंच्या मनात आहे. मी एक महिना आराम करेन आणि नंतर आयपीएल खेळेन. हे मानसिक असतं. आपण इतके पैसे कसे सोडायचे असा विचार ते करत असतात. पण हे अजिबात योग्य नाही. खेळाडूंनी दोन्ही गोष्टींचं संतुलन राखायला हवं. पैसा महत्वाचा आहे, पण आयपीएलला देश आणि राज्यापेक्षा जास्त महत्व देणं चुकीचं आहे," असं परखड मत प्रवीण कुमारने मांडलं आहे.