IPL 2024, PBKS vs MI : मुंबई इंडियन्सचा फास्टर बॉलर जसप्रीत बुमराह.. एखाद्या फलंदाजाला बाद करायचं काम त्याला दिलं तर तो कणाकणा दांड्या उडवतो. भल्या भल्या फलंदाजांना देखील बुमराहविरुद्ध (Jasprit Bumrah) खेळताना घाम फुटतो. मात्र, पंजाब किंग्जचा फिनिशर आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma) याने बुमराहला एका गुडघ्यावर बसून स्वीप शॉट मारला अन् तोही सिक्स... आशुतोषचा शॉट पाहून प्रेक्षकांच्या देखील भूवया उंचवल्या गेल्या. एकाबाजूने आशुतोष खेळत असताना पंजाब सामना जिंकणार, असं येडं गबाळं पोरगं देखील सांगू शकत होतं. मात्र, आशुतोषची विकेट पडली अन् रोहित शर्मासह पांड्याने देखील सुटकेचा श्वास घेतला. सामना मुंबईने जिंकला खरा पण आशुतोषने काळीज जिंकलं. सर्वात जबरी होता, तो बुमराहला मारलेला (Ashutosh Sharma sweep six shot) स्वीप सिक्स शॉट... या शॉटवर आशुतोष शर्माने भावना व्यक्त केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला आशुतोष शर्मा?


जसप्रीत बुमराहविरुद्ध स्वीप शॉट खेळणं माझी इच्छा होती. मी सराव करत असताना या शॉटवर मेहनत केली. याचा अभ्यास केला आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाजाला स्वीप शॉट मारला. मला विश्वास होता की मी सामना जिंकून देऊ शकतो, पण असं झालं नाही, असं आशुतोष शर्माने म्हटलं आहे. संजय बांगर सरांनी मला सांगितलं की, मी स्लॉगर नाहीये. मी आडवे तिडवे शॉट खेळू शकतो. त्यांचं हे छोटं वाक्य होतं. पण माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलं. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी खेळण्याचा प्रयत्न करतोय. मी हार्ड हिटर वैगेरे नाहीये. पण मी क्रिकेटचे विविध शॉट खेळतो. मी माझ्या खेळण्यात बराच बदल केला आणि त्याचा मला फायदा झाला, असंही आशुतोष शर्माने म्हटलं आहे.


विजय आणि पराजय हा खेळाचा एक भाग आहे. पण तुम्ही तुमच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे, याचाच विचार मी करत असतो. जर तुम्ही चांगला खेळले तरच तुम्ही जिंकू शकता, असंही आशुतोष शर्माने म्हटलं आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याने देखील आशुतोषचं कौतूक केलं होतं. अविश्वसनीय, तो ज्याप्रकारे खेळला. त्यामुळे नक्कीच त्याचं कौतूक करायला हवं. मला विश्वास आहे की, त्याचं भविष्य उज्वल आहे. आम्ही ठरवलं होतं की आशुतोषला खराब बॉल टाकायचे नाहीत, पण त्याने आपल्या फलंदाजीतून सर्वांना प्रभावित केलंय. असंही पांड्याने म्हटलं आहे.



दरम्यान, आशुतोष शर्मा हा मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. रेल्वेपूर्वी तो स्टेट पातळीवर देखील खेळला. आतापर्यंत खेळलेल्या 4 फर्स्ट क्लास, 7 लिस्ट ए आणि 16 टी-20 मॅचेसमध्ये त्याने अनुक्रमे 268, 56 आणि 450 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडला होता.