IPL 2024 Auction RCB Selection: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला आतापर्यंतच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 16 पर्वांमध्ये एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. 19 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये संघ उत्तम खेळाडूंना विकत घेईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र आरसीबीला मैदानाबाहेर लिलावामध्येही ठसा उमटवणारी कामगिरी करता आली नाही. आरसीबीने मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारख्या मोठ्या खेळाडूंना बोली लावताना गमावलं. चाहत्यांनीही संघ व्यवस्थापनाच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. अशातच एका माजी क्रिकेटपटूने तर आरसीबीला चांगलेच झापले आहे.


आरसीबीची लिलावात फारच सुमार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे माजी क्रिकेटपटू दोडा गणेश यांनी आरसीबीने बेसिक गोष्टींमध्ये चूक केल्याचं सांगतानाच जेतेपदापर्यंत घेऊन जाणारा संघ व्यवस्थापनाला लिलावादरम्यान तयार करता आला नाही असं म्हटलं आहे. आरसीबीने हर्षल पटेल, जोस हेजलवूड, वाणीनडू हसरंगा यासारख्या खेळाडूंना करारमुक्त केलं. मात्र त्यांनी लिलावामध्येही लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि अल्जारी जोसेफ यासारख्या खेळाडूंनाच संघात स्थान दिलं. कोणताही मोठा आणि महत्त्वाचा खेळाडू आरसीबीने विकत घेतला नाही. आरसीबीच्या या निवडीवरुन दोडा गणेश यांनी संघाला चांगलेच फैलावर घेतलं आहे. संघाच्या चाहत्यांनी संघ व्यवस्थापनापेक्षा चांगला संघ बांधला असता, असा टोला दोडा गणेश यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन लगावला आहे.


अर्धे पैसे दिले असते तरी...


लिलावामध्ये सहभागी होताना आरसीबीकडे 23.25 कोटी रुपये होते. याच मुद्द्यावरुन माजी क्रिकेटपटू दोडा गणेश यांनी संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. "आरसीबीने चाहत्यांना अर्धे पैसे दिले असते आणि लिलावादरम्यान मुक्तपणे निर्णय घेण्याचे हक्क दिले असते तर पैंजेवर सांगतो की आपल्या चाहत्यांनी अधिक संतुलित संघ निवडला असतात. सर्व शक्यतांचा विचार करता त्यांनी बराच पैसाही वाचवला असता. एखादा एवढा मोठा संघ एवढी बेसिक चूक करेल यावर विश्वास बसत नाही," असं दोडा गणेश यांनी म्हटलं आहे. म्हणजेच अंदाजे 12 कोटी रुपये दिले असते तरी चाहत्यांनी चांगला संघ निवडला असता असं दोडा गणेश याचं म्हणणं आहे.



त्याच्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करणं फारच झालं


तसेच दोडा गणेश यांनी डावखुरा फिरकी गोलंदाज यश दयालवर 5 कोटी रुपये खर्च केल्याच्या मुद्द्यावरुनही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. "कोणत्याही गोलंदाजासाठी एखादा दिवस वाईट असू शकतो. यश दयालनेही एक ओव्हर फार वाईट टाकली. दयाल हा उत्तम गोलंदाज आहे. तसेच तो चांगली कामगिरीही करतो. मात्र त्याच्यासाठी 5 कोटी खर्च करणं फारच बावळपणाचं आहे. हे पाहून माझं मन व्यथित झालं आहे," असं दोडा गणेश म्हणाले.



गोलंदाजीची धुरा कोणाकडे?


आरसीबीच्या संघाला 2024 च्या पर्वामध्ये गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराज, रेसी टोप्ले, अल्झारी जोसेफ, आकाश दीप, मयंक डांगर, करण शर्मा आणि यश कुमार यांच्यावर अवलंबून रहावं लागणार आहे.