IPL 2024 Big Change in Rule: इंडियन प्रिमिअर लिग 2024 चा लिलाव आज म्हणजेच 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच आयपीएलच्या व्यवस्थापकीय समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फलंदाजांना कायमच फायदा होणारा फॉरमॅट अशी ओळख असलेल्या टी-20 क्रिकेटमधील हा नवीन बदल गोलंदाजांसाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. या नव्या नियमामुळे गोलंदाजांनाही फलंदाजांवर वर्चस्व गाजवता येणार आहे. 


काय आहे नवा नियम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2024 मधील गोलंदाजांना फायद्याचा ठरणार हा नियम बाऊन्सरसंदर्भात आहे. आगामी पर्वामध्ये प्रत्येक गोलंदाजाला एका ओव्हरमध्ये 2 बाऊन्सर टाकता येणार आहेत. यापूर्वी केवळ 1 बाऊन्सर प्रत्येक ओव्हरमध्ये टाकता यायचा. त्याहून अधिक बाऊन्सर टाकल्यास तो नो बॉल ग्राह्य धरला जायचा. 'ईएसपीएनक्रीकइन्फो'ने दिलेल्या माहितीनुसार, एका ओव्हरमध्ये 2 बाऊन्सरची संकल्पना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2023-24 च्या सय्यर मुस्ताक अली चषक स्पर्धेमध्ये आजमावली आहे. घरगुती टी-20 स्पर्धेतील हा ओव्हरला 2 बाऊन्सरचा प्रयोग यशस्वी ठरल्याने आता तो थेट आयपीएलमध्ये राबवला जाणार आहे. 


गोलंदाजांकडून स्वागत


सौराष्ट्रकडून खेळणारा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. "एका ओव्हरमध्ये 2 बाऊन्सर फायद्याचे ठरणार आहेत. यामुळे गोलंदाजांना फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी मदत होईल," असं उनाडकटने 'ईएसपीएनक्रीकइन्फो'शी चर्चा करताना म्हटलं. "मी आता एक स्लो बाऊन्सर टाकला तर पुन्हा ओव्हरमध्ये बाऊन्सर पडणार नाही याची फलंदाजांना खात्री असते. आता मात्र पहिल्या 3 बॉलमध्ये एका बाऊन्सर टाकल्यानंतर पुढल्या 3 बॉलमध्ये तुम्ही पुन्हा एकदा बाऊन्सरचा वापर करु शकता. बाऊन्सरविरुद्ध उत्तम न खेळणाऱ्यांना अधिक सावध रहावं लागणार आहे," असं उनाडकट म्हणाला. 



इम्पॅक्ट प्लेअरचा नियम जैसे थे


2023 साली आयपीएलमध्ये लागू करण्यात आलेला इम्पॅक्ट प्लेअरचा नियम यंदाच्या पर्वामध्येही कायम राहणार आहे. या नियमानुसार मैदानात खेळणाऱ्या 11 खेळाडूंबरोबरच संघ अन्य 4 खेळाडू तयार ठेवतो. नाणेफेक होताना या 4 खेळाडूंची नावं जाहीर केली जातात. या 4 पैकी कोणत्याही एका खेळाडूला अन्य खेळाडूच्या मोबदल्यात संघात खेळवता येतं. सामन्यातील परिस्थिती पाहून हा खेळाडू कोण असेल आणि त्याच्याकडून काय अपेक्षित आहे या नुसार हा खेळाडू निवडता येतो. मात्र हा इम्पॅक्ट प्लेअर भारतीयच हवा असाही नियम आहे. संघात किती परदेशी खेळाडू असावेत यावर 2023 पासून कोणतंही बंधन नाही.