धोनीने प्रॅक्टीसदरम्यान लगावलेले 6 पाहून चाहते थक्क! हा Video एकदा पाहाच
IPL 2024 CSK Training Viral Video Of Dhoni: यंदाचं आयपीएलचं पर्व हे धोनीचं शेवटचं आयपीएल असेल अशी जोरदार चर्चा असतानाच सरावादरम्यानचा धोनीचा हा थक्क करणारा व्हिडीओ समोर आला असून तो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
IPL 2024 CSK Training Viral Video Of Dhoni: इंडियन प्रिमिअर लीगच्या आगामी पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. धोनीच्या चाहत्यांसाठी दरवर्षी आयपीएल म्हणजे आपल्या आवडत्या खेळाडूला मैदानात बॅक इन अॅक्शन पाहण्याची संधी असते. यंदाही धोनीला मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सीएसकेला 5 वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीचं यंदाचं शेवटचं आयपीएल असेल अशी चर्चा आहे. आयपीएलचं 17 वं पर्व 22 मार्चपासून म्हणजेच शुक्रवारपासून सुरु होत आहे. चेन्नईमध्ये पहिला सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान खेळवला जाणार आहे.
धोनीचा तो व्हिडीओ व्हायरल
याच सामन्यापूर्वी मैदानात घाम गाळणारा धोनी पूर्ण तयारीनेच मैदानात उतरणार असून चाहत्यांना त्याची झलक सरावादरम्यान पाहण्यास मिळाली. सोशल मीडियावर धोनीच्या सरावाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी लांबच लांब आणि उंच षटकार लगावताना दिसत आहे. एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवरील सरावामध्ये धोनी सामन्यामध्ये खेळतो त्याप्रमाणेच आक्रमक फलंदाजी करताना पाहून चाहते सुखावले आहेत.
चाहते म्हणतात सलामीलाच ये
धोनीचा हा अवतार पाहून चाहत्यांच्या त्याच्याकडून यंदाच्या पर्वातून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. धोनीच्या बॅटमधून यंदा धावांचा पाऊस पडणार, हेलिकॉप्टर शॉर्ट पहायला मिळणार असं अनेकांनी कमेंट्स करुन म्हटलं आहे. काहींनी तर धोनीने थेट सलामीवीर म्हणून चेन्नईकडून फलंदाजीसाठी यावं असं म्हटलं आहे. "धोनीने ऋतूराजबरोबर सलामीवर म्हणून मैदानात उतरावं," असं एका चाहत्याने म्हटलं आहे. "धोनीच्या करिअरमधील सर्वोच्च शिखर आपल्याला पाहायला मिळणार आहे," अशी शक्यता अन्य एकाने व्यक्त केली आहे.
धोनी 3 आठवडे आधीपासूनच चेन्नईत
धोनीचं हे शेवटचं आयपीएल असल्याची चर्चा असल्याने अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी धोनीबद्दलच्या आपल्या भावना जिओ सिनेमावर बोलताना व्यक्त केल्या आहेत. धोनी आणि सीएसकेच्या नात्याबद्दल बोलताना धोनीचा संघ सहकारी सुरेश रैनाने, "धोनीबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो आयपीएल सुरु होण्याच्या एक महिना ते 3 आठवडे आधी चेन्नईत दाखल होतो. तो दमट हवामानामध्ये रोज दोन ते 3 तास फलंदाजी करतो तसेच जीमममध्येही घाम गाळतो. यादरम्यान तो संघातील खेळाडूंशी चर्चा करत अशल्याना चांगली टीम बॉण्डींग होते. हे फारच महत्त्वाचं आणि नव्या खेळाडूंसाठी जादूई अनुभावासारखं असतं," असं मत व्यक्त केलं.