`माझी एकच चूक झाली की सूर्यकुमार यादवला...`, गौतम गंभीरने अखेर 7 वर्षांनी केला खुलासा, `त्याला बेंचवर...`
IPL 2024: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात सामील झाला होता. 2017 पर्यंत तो संघाचा भाग होता.
IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवला संधी देत भारतीय क्रिकेटला एक नवा चेहरा दिला आहे. मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सूर्यकुमार आता मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू असून, त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिलं जात आहे. मुंबई इंडियन्समधील आपल्या खेळीमुळे सूर्यकुमारला भारतीय संघात संधी मिळाली आणि तो रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला. आज मुंबईचा अविभाज्य भाग असणारा सूर्यकुमार यादव एकेकाळी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा भाग होता. 2014 ते 2017 दरम्यान तो केकेआरमध्ये होता. पण नंतर त्याला रिलीज करण्यात आलं होतं. त्यादरम्यान केकेआरचा कर्णधार असलेल्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) सूर्यकुमार यादव आपली सर्वात मोठी खंत असल्याचं सांगितलं आहे.
सूर्यकुमार यादवने 2012 मध्ये आपल्या आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. त्यावेली त्याने मुंबईकडून एकच सामना खेळला होता. यानंतर मुंबईने त्याला रिलीज केलं होतं. 2014 मध्ये कोलकाताने त्याला संघात घेतलं होतं. याचवर्षी केकेआरने आपली पहिली ट्रॉफी जिंकली होती. केकेआरमधील आपल्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 54 सामन्यात 608 धावा केल्या. पण त्यातील बहुतेक धावा खालच्या फळीत फलंदाजी करताना त्याने केल्या.
गौतम गंभीरेने Sportskeeda शी संवाद साधताना गौतम गंभीरने आपण सूर्यकुमार यादवमधील क्षमता ओळखण्यात किंवा योग्य क्रमांकावर त्याला खेळवू शकलो नाही याची खंत असल्याचं मान्य केलं.
“नेतृत्वाने सर्वोत्तम क्षमता ओळखणं आणि त्या जगाला दाखवणं अपेक्षित असतं. माझ्या सात वर्षांच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मला एकाच गोष्टीची खंत आहे, ती म्हणजे मी आणि एक संघ म्हणून सूर्यकुमार यादवच्या क्षमतेचा सर्वोत्तम वापर करू शकले नाही. तुम्ही फक्त एकाच खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर खेळवू शकता. नेतृत्व करताना तुम्हाला संघातील इतर 10 खेळाडूंचाही विचार करावा लागतो. तो क्रमांक 3 वर अधिक प्रभावी ठरला असता, परंतु क्रमांक 7 वर तितकाच चांगला होता,” असं गौतम गंभीरने सांगितलं.
गौतम गंभीरने यावेळी सूर्यकुमार यादव एक टीम प्लेअर असल्याचं सांगत कौतुक केलं. तसंच त्याला 2015 मध्ये उप-कर्णधार का केलं होतं याचा खुलासा केला. "तो एक टीम खेळाडूही होता. खेळाडू कोणीही शकतो, पण टीम प्लेअर होणं अवघड काम असतं. तुम्ही त्याला सहाव्या, सातव्या क्रमांकावर खेळवा किंवा बेंचवर बसला, तो नेहमी हसत असतो आणि संघासाठी परफॉर्म करायला तयार असतो. म्हणून आम्ही त्याला उप-कर्णधार केलं," अशी कौतुकाची थाप गौतम गंभीरने दिली आहे