`तुम्ही कर्णधार असताना काय मोठं...`, हार्दिकच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या डेव्हिलिअर्सला गंभीरने सुनावलं, `संत्रं आणि सफरचंद...`
IPL 2024: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर टीका करणाऱ्या एबी डेव्हिलिअर्सला (AB de Villiers) गौतम गंभीरने (Gautam Gambhir) खडेबोल सुनावले आहेत. गंभीरने एबी डेव्हिलिअर्सला त्याच्या रेकॉर्डची आठवण करुन दिली आहे.
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर आणि कोलकाता संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर टीका करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गज खेळाडू एबी डेव्हिलिअर्सला (AB de Villiers) खडेबोल सुनावले आहेत. मुंबई इंडियन्सने या हंगामात हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवल्यानंतर संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. पाचवेळा चॅम्पिअन राहिलेला मुंबई इंडियन्स संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. गुणतालिकेत मुंबई संघ नवव्या स्थानी आहे.
भारताच्या या अष्टपैलू खेळाडूला चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. क्रिकेट चाहत्यांसह पांड्यावर केविन पीटरसन आणि एबी डेव्हिलियर्ससह माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. संघ मैदानावर सामूहिक प्रयत्न करण्यात अयशस्वी ठरला असं सांगताना डेव्हिलिअर्सने हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं. हार्दिकचं नेतृत्व अस्सल नसून थोडंसं अहंकारी होतं अशी टीका त्याने केली.
दरम्यान हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्या एबी डेव्हिलिअर्सला गौतम गंभीरने सुनावलं आहे. गंभीरने एबी डेव्हिलिअर्सला नेतृत्व करताना त्याची कामगिरी किती खराब होती याची आठवण करुन दिली आहे.
“जेव्हा ते स्वतः कर्णधार होते तेव्हा त्यांची कामगिरी कशी होती? मला वाटत नाही की केविन पीटरसन किंवा एबी डेव्हिलिअर्सने कर्णधारपदी असताना त्यांच्या कारकिर्दीत नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून फारशी चांगली कामगिरी केली. जर तुम्ही त्यांचे रेकॉर्ड बघितले तर ते इतर कोणत्याही नेतृत्वापेक्षा वाईट आहेत असं मला वाटतं,” असं गंभीरने Sportskeeda वर म्हटलं.
दोन वेळा आयपीएल विजेत्या कर्णधाराने यावेळी मोठं विधान करत तो त्याच्या वैयक्तिक कामगिरीशिवाय संघासह काहीही साध्य करण्यात अपयशी ठरला असल्याचं म्हटलं. “मला वाटत नाही की एबी डेव्हिलियर्सने आयपीएलमधील कोणत्याही सामन्याचं नेतृत्व केलं किंवा त्याने स्वतःच्या धावसंख्येशिवाय काहीही साध्य केलं आहे. संघाच्या दृष्टिकोनातून त्याने काही साध्य केलं आहे असे मला वाटत नाही. हार्दिक पांड्या अजूनही आयपीएल विजेता कर्णधार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त संत्र्याची तुलना संत्र्याशी करावी, सफरचंदाची संत्र्याशी करु नये,” असंही तो म्हणाला.
एबी डेव्हिलिअर्सने हार्दिक पांड्याबद्दल आपल्या विधानावर स्पष्टीकरणही दिलं आहे. "मी ते अस्सल नव्हतं असं म्हणण्यामागे मीदेखील तसाच खेळलो होतो. मी घरी असतो तसा मितभाषी नव्हतो. तुम्ही मैदानावर जे पाहता तो थोडा अभिनय असतो. कधीतरी तुम्हाला समोरच्या संघाला आक्रमकपणा दाखवावा लागतो. हार्दिक पांड्याही तेच करत आहे," असं एबी डेव्हिलिअर्सने म्हटलं.