Gujarat Titans IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans) होम ग्राऊंडमध्ये पराभवाची नामुष्की ओढावली. हातातोंडाशी आलेला विजय पंजाब किंग्सच्या (PBKS) युवा फलंदाजांनी अक्षरश: खेचून आणला. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सचा संघ चार सामने खेळला असून दोन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील गुजरातचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 24 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. पहिल्या सामन्या गुजरातने मुंबईवर अगदी निसटता विजय मिळवला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. गुजरातच्या राशिद खान, साई किशोर आणि मोहित शर्माने आपला षटकांचा कोटा पूर्ण केला होता. शुभमन गिलकडे केवळ अजमतुल्लाह ओमरजाई, स्पेन्सर जॉनसन आणि उमेश यादवचा पर्याय होता. 


उमेश यादवच्या पहिल्या चेंडूवर हार्दिकने षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. पण तिसऱ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला आणि सामना गुजरातच्या बाजूने झुकला. 


गुजरातचा पंजाबविरुद्धचा सामना
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही काहीसं असंच घडलं. फरक इतकाच होता की हा सामना गुजरातला गमवावा लागला. पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. पण शुभमन गिलकडे केवळ युवा दर्शन नलकांडेचा पर्याय होता. दर्शनने पहिल्या चेंडूवर आशुतोश शर्माला बाद केलं. पण दुसरा चेंडू वाईड टाकला. पुढच्या पाच चेंडूवर सहा धावांची गरज असताना चौथ्या चेंडूवर शशांक सिंहने चौका मारला आणि इथेच पंजाबने बाजी मारली. 


मोहम्मद शमीची उणीव
या हंगामात शुभमन गिलला सर्वाधिक उणीव जाणवतेय ती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून तो बाहेर पडलाय. शमीच्या जागी गुजरात टाययन्सने उमेश यादवला संधी दिली आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात गुजरातमध्ये मोहम्मद शमी असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. 


मोहम्मद शमीने आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी केली होती. 17 सामन्यात त्याने तब्बल 28 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये शमी आतापर्यंत 110 सामने खेळला आहे. यात त्याने 127 विकेट घेतल्या आहेत. गुजरात संघाची फलंदाजी दमदार आहे. पण मोहम्मद शमीच्या गैरहजेरीत गोलंदाजी म्हणावी तितकी मजबूत नाहीए. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये ही उणीव प्रकर्षणाने जाणवतेय. हा संपूर्ण हंगाम गुजरात टायन्स आणि शुभमन गिलला गोलंदाजीवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे.